चंद्रशेखर बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : माहिती तंत्रज्ञान उद्योगांना प्रोत्साहन व रोजगार निर्मितीसाठी देशभरात सुरू करण्यात आलेल्या एकूण ६२ ‘सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क’ (एसटीपी) पैकी ५४ दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील म्हणजे तुलनेने लहान शहरांमध्ये आहेत. त्यात महाराष्ट्रातील नागपूरसह सहा शहरांचा समावेश आहे.

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या माहितीनुसार ‘आयटी’ उद्योगातून रोजगार निर्मितीच्या संधी अधिक असल्याने केंद्र शासनाने या क्षेत्रातील उद्योगांना चालना देण्यासाठी देशभरातील एकूण ६२ शहरांमध्ये ‘सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क’ (एसटीपी) पार्क सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रामुख्याने ‘आयटी पार्क’साठी मोठय़ा शहरांची निवड केली जाते. मात्र, निवडलेल्या एकूण शहरांपैकी ५४ ही द्वितीय व तृतीय श्रेणीतील शहरे आहेत.

 यात महाराष्ट्रातील नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या सहा शहरांचा समावेश आहे. याशिवाय नवीन २२ आयटी पार्कला मान्यता दिली आहे. ही सर्व लहान शहरे आहेत.

केंद्र सरकारच्या या योजनेतून २४६ युनिट्सची स्थापना झाली असून त्यातून ५०,५१५ जणांना थेट रोजगार उपलब्ध झाला आहे. १२ ‘सॉफ्टवेअर पार्क’मध्ये उत्पादनासाठी केंद्र सरकारने ३ वर्षांत ९५ कोटी अर्थसाहाय्य केल्याची माहती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाली आहे.

राज्यनिहाय ‘सॉफ्टवेअर पार्क’

महाराष्ट्र – ६, कर्नाटक – ५, पश्चिम बंगाल – ५, उत्तर प्रदेश – ५, आंध्र प्रदेश – ४ तमिळनाडू – ४,  तेलंगणा – ३, मध्य प्रदेश – ३ ओडिशा – ३, झारखंड – २, गुजरात – २, इतर राज्ये – प्रत्येकी एक एकूण – ६२