अकोला : जिल्ह्यातील केळीवेळी येथील एका शेतामध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात आठ फूट लांब विशालकाय अजगर गंभीर जखमी झाल्याचा प्रकार समोर आला. या गंभीर जखमी अवस्थेतील अजगराला सर्पमित्रांनी पकडून पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले. या अजगरावर दोन तास शस्त्रक्रिया करून त्याला जीवदान देण्यात आले आहे.
अकोला जिल्ह्यातील केळीवेळी येथे एका शेतात सोमवारी सायंकाळी अजगर आढळून आला. हा विशालकाय अजगर पाहून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या अजगराची माहिती अकोला येथील ज्येष्ठ सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांना देण्यात आली. बाळ काळणे व रेस्क्यू चमूचे सर्पमित्र तथा वन कर्मचारी तुषार आवारे यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. शेतातील अजगराला अतिशय शिताफीने बाळ काळणे यांनी पकडले. त्या अजगराच्या तोंडाला गंभीर जखमा असल्यामुळे तो सुन्न झाला असल्याचे दिसून आले. जखमी अजगराचा जीव वाचवा म्हणून गावातील प्रफुल नागोलकार, गोलू नागळे, गोटु देशमुख, कृष्णा ताठे, तुषार हिवरे, किशोर खेडकर यांनी प्रयत्न केले.
वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वास थोरात व वनपाल गजानन इंगळे यांच्या सूचनेवरून सर्पमित्र बाळ काळणे आणि त्यांच्या चमूने गंभीर जखमी अजगराला अकोल्यातील पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले. त्या गंभीर जखमी अजगरावर तब्बल दोन तास शस्त्रक्रिया करण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश बुकतारे, डॉ. दीपक उकाळे, डॉ. अनंत पाटील, डॉ. गजेद्र अंबलकार व सहाय्यक अश्विन लव्हाळे, निखिल वरणकार यांनी अजगारावर उपचार केले.
अकोला : जिल्ह्यातील केळीवेळी येथील एका शेतामध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात आठ फूट लांब विशालकाय अजगर गंभीर जखमी झाल्याचा प्रकार समोर आला. pic.twitter.com/gepvSPmTAH
— LoksattaLive (@LoksattaLive) December 17, 2024
हेही वाचा – भंडाऱ्याचे ‘कार्यसम्राट’ बनले ‘नटसम्राट’… मंत्रिपदासाठी थयथयाट…
या अजगराला नीलगाय किंवा काळवीटाने लाथ मारून गंभीर जखमी केल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. अजगर विविध प्रकारचे पक्षी आणि सस्तन प्राणी खातात. जगातील सर्वात मोठ्या सापांच्या प्रजातींपैकी एक असल्याने अजगर हरीण, रानडुक्कर, माकडे, घुशी, उंदीर खाऊन निसर्ग चक्र सुरक्षित ठेवतो. अजगर शिकार शोधण्यासाठी फिरतात. खाण्यास पुरेसे मिळाल्यास ते पुढील अनेक दिवस किंवा आठवडे त्यांचे जेवण पचण्यास शरीर उबदार ठेवतात. ते शिकार पूर्ण गिळतात. अजगर भारतात आढळणारा सर्वात मोठा बिनविषारी साप आहे, अशी माहिती ज्येष्ठ सर्पमित्र बाळ काळणे यांनी दिली. आतापर्यंत विविध भागांतून ६५ च्यावर अजगर पकडून त्यांना जंगलात सोडत जीवदान दिले आहे, असेही ते म्हणाले.