यवतमाळ : उन्हाळाची चाहूल लागताच जंगलानजीक शिकाऱ्यांच्या चकरा वाढल्या आहेत. जिल्ह्यात पांढरकवडा तालुक्यात येत असलेल्या टिपेश्वर अभयारण्यातील वाघ या शिकाऱ्यांच्या रडावर असल्याचे चित्र आहे. वाघाचा एक बछडा टिपेश्वरमध्ये जखमी अवस्थेत फिरत असल्याने तो शिकाऱ्यांच्या तावडीत तर सापडला नव्हता ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या बछड्यावर अद्यापही उपचार झाले नसल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
हेही वाचा >>> वर्धा : शेतकऱ्यांना मिळणार धान्याऐवजी रोख रक्कम; निकष व जिल्हे कोणते जाणून घ्या…
टिपेश्वर अभयारण्यातील तलाव परिसरातील टी-२ वाघिणीचे दीड वर्षीय दोन बछडे पाणी पिण्यासाठी आले असताना एक बछडा जखमी अवस्थेत आढळून आला आहे. तो लंगडत चालत असल्याचे दिसते. गेल्या पाच, सहा दिवसांपासून तो उपचाराविना या परिसरात फिरत असल्याचे सफारीदरम्यान अनेक पर्यटकांनी बघितले आहे. आठ दिवसापूर्वी एका गाईडला हा जखमी वाघ आढळला. त्यानंतर एका पर्यटकाला तो जखमी वाघ दिसला. त्याने त्याचे चित्रिकरणही केले. या बछड्याला उपचाराची गरज असल्याचे व्हिडिओमधून दिसते. हा वाघ कशामुळे जखमी झाला, त्याच्या शिकारीचा प्रयत्न झाला की, तो शिकार करताना जखमी झाला, याबाबत संभ्रम आहे. टिपेश्वर अभयारण्यात ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यात हा वाघ वनाधिकाऱ्यांना दिसला नाही का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
टिपेश्वर अभयारण्यात २२ पेक्षा अधिक वाघांचे वास्तव्य असल्याचे सांगण्यात येते. येथील प्रसिद्ध आर्ची, फोरमार्क, टी-२ या वाघिणी आणि जंजीर, स्टार मेल हे नर वाघ पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. आर्चीला तीन बछडे असून, फोरमार्कला चार तर टी-२ वाघिणीस दोन बछडे आहेत. अनेकदा हे वाघ सहकुटुंबही आढळतात. टिपेश्वरचे क्षेत्रफळ अवघे १४८ चौरस किमी असल्याने येथे हमखास व्याघ्र दर्शन होत असल्याने दररोजच पर्यटकांची गर्दी असते. सुन्ना आणि माथनी हे दोन प्रवेशद्वार आहेत. नव्यानेच कोसदरी हे नवीन प्रवेशद्वार सुरू करण्यात आलेले आहे. जंगल लहान असल्याने येथील वाघ लगतच्या परिसरात फिरतात. अभयारण्यास सुरक्षा भिंत किंवा अन्य सुरक्षा नसल्याने येथे शिकाऱ्यांही मुक्त वावर आहे. त्यामुळे या परिसरात वाघांची शिकार करण्यासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगाना आदी राज्यातील शिकारी या परिसरात सक्रिय असल्याची माहिती सुत्रांनी दिली. २०१६ व २०२२ मध्ये अभयारण्यात वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या तारांच्या जाळ्यात अडकून एक वाघ जखमी झाला होता. तरीही वन विभागाने येथील वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत, असा आरोप आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी टिपेश्वर अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश बाळापुरे यांच्याशी संपर्क साधला असता ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचा संदेश आला.