लोकसत्ता टीम
नागपूर: काँगेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. २०१७ मध्ये ते महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी नागपूरमध्ये आले असता त्यांच्यावर शाईफेकण्यात आली होती. ही घटना पक्षातील अंतर्गत गटबाजीतून घडली घडली असली तरी तेव्हा चव्हाण यांनी मात्र याबाबत राष्ट्रीय स्वंयसेवक संघ व भारतीय जनता पार्टीला जबाबदार धरले होते.
२०१७ मध्ये नागपूरमध्ये महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण तापले आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून तेव्हा अशोक चव्हाण यांनी संपूर्ण लक्ष नागपूरच्याच निवडणुकीवर केंद्रीत केले होते. १२ फेब्रुवारी २०१७ ला ते प्रचारासाठी येथे आले होते. पूर्व नागपुरातील हसनबाग चौकात सायंकाळी चव्हाण यांची सभा आयोजित करण्यात आली होती. चव्हाण सभास्थळी आसनस्थ होऊन काही वेळ होत नाही तोच एका कार्यकर्त्याने व्यासपीठावर येत चव्हाण यांच्यावर शाई फेकली होती. चव्हाण यांच्या निषेधाच्या घोषणा देत अंडी फेकण्यात आली. शाई फेकणाऱ्याला खाली खेचण्यात आले आणि चोप देण्यात आला होता.
आणखी वाचा-अमित शहांच्या अकोल्यातील सभेची तयारी करता करता आले नाकी नऊ, वर्धेकर भाजप नेते म्हणतात…
या घटनेवर प्रतिक्रिया देताना तेव्हा चव्हाण म्हणाले होते “आरएसएस, भाजपच्या धाकदपटशाहीला आम्ही भीत नाही, भीक घालत नाही. या शाईफेकीमागे संघ-भाजप की पक्षांतर्गत वाद आहे याची माहिती घेऊ.” या घटनेला तब्बल सात वर्ष झाली. मात्र चव्हाण यांनी भाजप प्रवेश केल्याने त्याला उजाळा मिळाला आहे. तेव्हा चव्हाण यांची भाजपबाबत वेगळी भूमिका होती आणि आता ते त्याच पक्षात प्रवेशकर्ते झाले, अशी प्रतिक्रिया काँग्रेसजण देऊ लागले आहे.