लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला : दूषित पाण्यामुळे अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अनेक प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांची प्रकृती बिघडल्याची घटना शुक्रवारी समोर आली. त्यातील बहुतांश प्रशिक्षणार्थींना का‌वीळची लागण झाली. या प्रकरणाची दखल विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली असून चौकशी करण्यासंदर्भात त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले. याप्रकरणी चौकशी करण्यात येत असून पोलीस प्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अकोल्यात दाखल झाले आहेत.

अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना दूषित पाण्यामुळे मळमळ आणि उलट्या होत होत्या. त्यांच्यात कावीळसदृश्य लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्यांना सुरुवातीला शासकीय रुग्णालयात प्राथमिक तपासणीसाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर सर्वांना खासगी रुग्णालयात दाखल केले. सुमारे ६० पेक्षा जास्त महिला पोलिसांची प्रकृती बिघडली होती. काहींना प्रथमोपचार करून परत पाठवण्यात आले आहे. काही मुलींवर गेल्या तीन ते चार दिवसांपासून उपचार सुरू आहेत. सुमारे ३० प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांना कावीळ, तर एका प्रशिक्षणार्थीला डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. दूषित पाणी पिल्यामुळे प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांची प्रकृती बिघडल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. काहींना उन्हाचा देखील फटका बसला. या पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये काही प्रशिक्षणार्थी पश्चिम महाराष्ट्रातील असल्याने त्यांना वातावरणात बदल सहन झाला नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे. याप्रकरणी चौकशी केली जात आहे.

आणखी वाचा-सुधीर मुनगंटीवार यांची समाज माध्यमावर बदनामी, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, या प्रकरणी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेऊन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले. खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या प्रशिणार्थींच्या उपचाराचा खर्च पोलीस अधीक्षक कार्यालय यांनी करावा. पिण्यासाठी पाणी ‘आरओ’चे असेल तरी स्वयंपाकासाठी दुसरे पाणी वापरले जाते का? तसेच स्वयंपाक शुद्ध केला जातो का? त्याची तपासणी झाली पाहिजे. नव्याने मुलींना त्रास होणार नाही, त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून वैद्यकीय अहवाल लक्षात घेऊन कशातून बाधा झाली हे तपासावे अशी सूचना डॉ. नीलग गोऱ्हे यांनी केली आहे.

जलदगतीने तपास करा

महिला पोलीस अधिकाऱ्यांची प्रशिक्षण केंद्रावर एक समिती करावी. या प्रकारच्या घटना घडू नये म्हणून प्रशिक्षण केंद्रात वारंवार तपासणी करण्यात यावी. या घटनेसंदर्भात संबंधित अधिकारी यांना योग्य आदेश देण्यात यावेत. घटनेचा तपास अधिक जलदगतीने करावा व कोणाकडूनही हलगर्जीपणा झाला असल्यास चौकशी करून कडक कारवाई करावी, असे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी दिले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inquiry into deterioration of health of police trainees neelam gorhes letter to home minister ppd 88 mrj