नागपूर : मेडिकलमध्ये झालेल्या शुल्क घोटाळ्याच्या चौकशीला आंतर्गत समितीने गती दिली आहे. येत्या दोन दिवसांत चौकशी पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर मेडिकल प्रशासनाने या प्रकरणात समावेश असलेल्या कर्मचाऱ्यांना कडक कारवाईचे संकेत दिले आहे.
मेडिकलमध्ये उपचारातून बरे झाल्यानंतर चाचण्या, खाटांसह इतर चाचण्यांचे शुल्क भरताना ६६ क्रमांकावर तैनात असलेले कर्मचारी रुग्णाच्या नातेवाईकाला देण्यात येणाऱ्या पावतीमध्ये शुल्काचा वेगळा आकडा टाकत होते. तर प्रशासनाच्या पावतीमध्ये कमी रक्कम घेतल्याचे दर्शवले जात होते. गेल्या तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे पुढे येत आहे. या प्रकरणाची वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांच्या नेतृत्वातील चौकशी सुरू झाली आहे.
हेही वाचा – वर्धा: भरधाव ट्रक दुभाजकास धडकला अन् आग लागून भडकला
समितीत प्रा. डॉ. मोहंमद फैजल, डॉ. मनीष ठाकरे, प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख यांचा समावेश आहे. या समितीकडून पारदर्शक चौकशी करण्यात येत असून या प्रकरणात गुंतलेल्या सर्वांवर कारवाई होणार असल्याचे मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी स्पष्ट केले आहे. पूर्वी ‘एचआयएमएस’ योजनेअंतर्गत मेडिकलला कंत्राटी कर्मचारी आर्थिक व्यवहार सांभाळत होते. तेव्हा ही प्रक्रिया सुरळीत होती. परंतु, शासनाने ही प्रक्रिया बंद केल्यावर ही जबाबदारी स्थायी कर्मचाऱ्यांकडे आली. त्यानंतर हा घोटाळा झाला.