नागपूर: समृद्धी महामार्गावर ३० जूनच्या मध्यरात्री विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. मृतांच्या कुटुंबीयांनी सात महिने आंदोलन केल्यानंतर शासनाकडून परिवहन उपायुक्तांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती गठित झाली. परंतु या घटनेला एक वर्षे पूर्ण झाले असतानाही चौकशी समितीचा अहवाल काही आला नाही.
नागपूरहून- पुण्याला निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सचा ३० जून २०२३ रोजी मध्यरात्री सिंदखेडराजाजवळ (बुलढाणा) अपघात झाला होता. त्यात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली. परंतु राज्य शासनाकडून केवळ ५ लाख तर केंद्राकडून २ लाखच मिळाल्याचा आरापे या घटनेतील मृतांचे नातेवाईक अजय जानवे यांनी केला आहे.
हेही वाचा – नागपूर : कुणाच्या ‘आशीर्वादा’ने?
या घटनेला दोषी असलेल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी वर्धा, नागपूरमध्ये आंदोलन झाले. त्यानंतर शासनाने अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, मुंबई (मध्य), प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, अमरावतीचे प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते, बुलढाण्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त व उप पोलीस अधिकाऱ्यांची एक चौकशी समिती बनवली. समितीची १७ एप्रिल २०२४ रोजी बुलढाण्यात एकमात्र बैठक झाली. त्यात मृतांच्या कुटुंबीयांचेही म्हणणे एकूण घेत शासनाला अहवाल सादर करणार असल्याचे कळवले गेले. परंतु अद्यापही हा अहवाल शासनाकडे पोहोचला नसल्याचा संतप्त नातेवाईकांचा आरोप आहे. दगावलेल्यांच्या कुटुंबांना शिल्लक आर्थिक मदत, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांच्याशी भ्रमनध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
…तर उपमुख्यमंत्र्यांनी हा ‘जुमला’ असल्याचे सांगावे!
“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातात दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लक्ष रुपये मदतीची घोषणा केली. परंतु प्रत्यक्षात राज्याकडून ५ लाख तर केंद्राकडून २ लाखांचीच मदत मिळाली. शिल्लक मदतीसाठी वारंवार सत्ताधाऱ्यांना भेटल्यावरही काहीच झाले नाही. घटनेनंतर आरोपींवर कमकुवत कलमांतर्गत गुन्हे दाखल झाल्याने त्यांना लगेच जामीन मिळाला. उपमुख्यमंत्री यावर काहीही बोलत नाही. हे असेच चालणार असेल तर उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची घोषणा म्हणजे ‘जुमला’ होता, असे तरी एकदाचे जाहीर करावे.’’ – अजय जानवे, अपघातग्रस्त कुटुंबातील सदस्य, वर्धा.
समृद्धी महामार्ग कोठे आहे?
नागपूर ते मुंबईला जोडणारा ७०१ किमीचा समृद्धी महामार्ग, ज्यापैकी नागपूर ते इगतपुरी येथील भरवीर हा ६०० किमीचा द्रुतगती मार्ग सध्या वाहतुकीसाठी खुला आहे. हा सहा पदरी द्रुतगती मार्ग आहे. एक्सप्रेसवे अधिकृतपणे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग म्हणून ओळखला जातो. ती ३९० खेड्यांमधून पुढे जाते आणि महाराष्ट्रातील दहा जिल्हे ओलांडते.