वर्धा : विविध कारणांनी चर्चेत राहणाऱ्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापिठात गाेंधळ उडायला कोणतेही निमित्त तयारच असते. विद्यापिठातील विद्यार्थी, प्रशासन व प्राध्यापक यांच्यात उभे दोन गट पडले आहे. त्यामुळे सतत वादावादीने विद्यापीठ गाजत असते. आता मात्र एक मुद्दा सर्व विद्यार्थाना एकत्र आणणारा ठरत आहे. तो म्हणजे विद्यापीठ वसतीगृहात मिळणारे भोजन.

विद्यापीठात भगतसिंग, राजगूरू, चंद्रशेखर यांच्या नावे असलेल्या वसतीगृहातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. या ठिकाणी मिळणारे भोजन निकृष्ट दर्जाचे असल्याचा त्यांचा आराेप आहे. भोजनात किडे, अळ्या आढळून येत आहे. ही बाब जीवावर बेतू शकते, अशी भीती विद्यार्थी व्यक्त करतात.

 असे भोजन खाऊ घालणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी. निकृष्ट भोजनाची जबाबदारी निश्चीत करावी, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. आंदोलक विद्यार्थी म्हणतात की दर्जेदार भोजन मिळण्याचा त्यांचा हक्क आहे. मिळणाऱ्या भोजनाचे दैनंदिन मेन्यूकार्ड असावे. या मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. त्यावर आश्वासने मिळाली. पण कधीच अंमलबजावणी झालेला नाही.

अशी टाळाटाळ करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला पाहीजे. या संदर्भात प्रशासनाने आपली भूमिका लेखी स्वरूपात द्यावी, असे आंदोलक विद्यार्थी म्हणतात. चांगले भोजन देण्याची ठोस हमी मिळेपर्यत आंदोलन सुरूच ठेवण्याचा ईशारा विद्यार्थी देतात.

आंदोलक विद्यार्थ्यानी विद्यापीठाच्या कुलगुरु कार्यलयापुढे ठिया दिला आहे. प्राप्त माहितीनुसार विद्यापिठातील वसतीगृहातील भोजनालयाचे कंत्राट दिल्या जात असते. पण त्याची प्रक्रिया पुर्ण झालेली नाही. म्हणुन विद्यापिठाच्या काही कर्मचाऱ्यांवर भोजनालयाची जबाबदारी टाकन्यात आली. मिळत असलेल्या सडक्या भाज्यांवर विद्यार्थी संताप व्यक्त करतात. म्हणून त्यांनी सडक्या भाज्या मांंडून संताप व्यक्त करणे सुरू केले आहे. विद्यापिठाचे कुलसचिव डॉ. आनंद पाटील यांच्याशी संपर्क शक्य झाला नाही.

या हिंदी विद्यापीठास दोन वर्षानंतर पूर्णवेळ कुलगुरू लाभला आहे. पदभार स्वीकारत नाही तोच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची सलामी त्यांना भेटल्याची चर्चा आज सूरू झाली. परीक्षा, संशोधन, विविध उत्सव, वरिष्ठ व कनिष्ठ विद्यार्थी कलह, मेसमधील असुविधा अशी व अन्य कारणे विद्यापीठातील गोंधळामागे आहेत.

आता प्रथमच भोजन हा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यावरून सर्व गटातील विद्यार्थी एक झाले आहे. भोजनालायसाठी निविदा काढण्यात आली. पण काही कारणास्तव ती प्रक्रिया पूर्णच झाली नसल्याचे ऐकायला मिळते. विद्यार्थी चांगल्या भोजनाची ठाम व लेखी हमी मिळेपर्यंत आंदोलनावर अडून राहण्याची भूमिका घेऊन चुकले आहे.