अकोला : उन्हाळी कांदा तसेच बिजोत्पादनाला विविध किडींचा मोठा फटका बसला आहे. किडींमुळे सुमारे ४० टक्के उत्पादन घटले. कांद्याची उत्पादकता व बियाण्यांची प्रत घटण्यामागे अनेक कारणे आहेत, अशी माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मिरची व भाजीपाला संशोधन केंद्राकडून देण्यात आली.
हेही वाचा >>> शेगावात लाखांवर भविकांच्या साक्षीने रामनवमी उत्सव साजरा; राज्यातील नऊशे दिंड्यांसह हजारो वारकरी दाखल
कांद्याखालील क्षेत्र व उत्पादनात भारत जगातील दुसऱ्या क्रमांकावर आहे. वर्षभर कांदा पिकाला बाजारपेठ उपलब्ध असली तरी कांद्याच्या दरात कायम अस्थिरता असते. कांद्यापासून बियाणे तयार करण्याची क्षमता विषेशतः विदर्भातील बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम, वर्धा, अमरावती आदी जिल्ह्यांमध्ये आहे. देशात कांदा उत्पादनासाठी १० हजार मेट्रिक टन कांदा बियाण्याची गरज आहे. त्यापैकी सरकारी संस्था, विद्यापीठे आणि खासगी भाजीपाला कंपन्यांद्वारे २२०० ते २८०० मेट्रिक टन कांदा बियाणे तयार होऊ शकते. उर्वरित सर्व बियाणे शेतकरी स्वतः तयार करत असल्याने त्याची प्रत व शुद्धता यावर मोठे प्रश्नचिन्ह लागते. लागवडीतून कांद्याचे उत्पादन तसेच बियाण्याची प्रत व उत्पादकतेमध्ये अपेक्षित घट होण्यामागे अनेक कारणे आहेत. कांदा पिकावरील विविध किडींचा प्रादुर्भाव ४० ते ४२ टक्के उत्पादन घटण्यासाठी कारणीभूत असण्याचे शास्त्रीय पुरावे असल्याचे संशोधन केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले.
महाराष्ट्रात ५५ ते ६० टक्के उत्पादन
महाराष्ट्रात कांदा पीक खरीप हंगाम (जुन-जुलै लागवड व ऑक्टोबर नोव्हेंबर काढणी), रांगडा हंगाम (जुलै-ऑगस्ट लागवड व डिसेंबर-जानेवारी काढणी) आणि रब्बी किंवा उन्हाळी हंगामात (डिसेंबर-जानेवारी लागवड व एप्रिल-मे काढणी) शेतकऱ्यांकडून घेण्यात येते. त्यामुळे भारतातील कांद्याचे ५५ ते ६० टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते.