नागपूर : जळगाव रेल्वेस्थानकाच्या कचरापेटीत सापडलेल्या व जन्मत: अंध असलेल्या ‘माला’ला ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी वझ्झर येथील अनाथ आश्रमात वाढवून बाप म्हणून स्वत:चे नाव दिले. याच मालाने बुधवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) ‘गट ब’ आणि ‘गट क’ पूर्व परीक्षा उत्तीर्ण करून मोठे यश मिळवले. यानिमित्त तिचा आदिवासी विभागाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी सत्कार केला.
हेही वाचा >>> पाच हजारांवरील देयक ऑनलाईनच अदा करण्याच्या सक्तीमुळे महावितरण आर्थिक कोंडीत!.. प्रकरण काय पहा..
गिरीपेठ भागातील अतिरिक्त आयुक्त कार्यालयात हा गौरवसमारंभ पार पडला. समाजाने नाकारलेल्या १२७ मुलींसोबत मालाचा अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील शंकरबाबा पापळकर यांच्या बालगृहात जीवनप्रवास सुरू झाला. जिद्द व मेहनतीच्या बळावर मालाने शिक्षणाचा प्रवासही सुरू ठेवला. अमरावती येथील प्रतिष्ठित विदर्भ ज्ञान, विज्ञान महाविद्यालयातून (व्हीएमव्ही) तिने कला शाखेची पदवी पूर्ण केली. यानंतर २०१९ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. १२ सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या ‘गट ब’ आणि ‘गट क’ पूर्व परीक्षेत ती उत्तीर्ण झाली. हे कळताच ठाकरे यांनी तिला कार्यालयात बोलावून तिचा सत्कार केला. याप्रसंगी मालाने यशाचे श्रेय शंकरबाबा पापळकर, युनिक अकॅडमी अमरावतीचे प्रा. अमोल पाटील आणि मालाच्या उच्च शिक्षणात आर्थिक मदत करणाऱ्या प्रकाश टोपले यांना दिले. याप्रसंगी वझ्झर येथील अनाथ आश्रमातील वार्डन वर्षा काळे, मालाच्या मैत्रिणी ममता, वैशाली, पद्ममा आणि शिवकुमार पापळकर, राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेचे संचालक डॉ. पुरुषोत्तम मडावी, डॉ. नरेंद्र कोडवते, दिनेश शेराम, माहिती व जनसंपर्क खात्याचे समन्वयक अनिल गडेकर आणि इतरही उपस्थित होते.