नागपूर : इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या मित्राने विवाहितेला अश्लील छायाचित्र पतीला दाखविण्याची भीती दाखवून नऊ महिने लैंगिक शोषण केले. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याअंतर्गत घडली. या प्रकरणी पोलिसांनी इंस्टाग्रावरील मित्राविरूध्द गुन्हा नोंदवून अटक केली आहे. भूषण डफरे (२४) रा. तिनखेडा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तो एका खाजगी कंपनीत टेक्नीशियन या पदावर काम करतो.
पीडित महिला विवाहित असून तिला दोन मुली आहेत. एप्रिल २०२३ मध्ये आरोपी भूषण सोबत इंस्टाग्रामवर तिची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. दोघेही जवळ आल्याने त्यांच्यात संबध निर्माण झाले. मागील काही महिन्यांपासून त्यांच्या भेटी गाठी सुरु असल्याची कुणकुण परिसरातील लोकांना लागली. त्यामुळे विवाहितेने माघार घेण्याचा निर्णय घेतला. ती त्याला भेटणे टाळायची.
हेही वाचा…रामाचे अस्तित्व नाकारणाऱ्यांना उत्तर देणार नाही; फडणवीस
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या भूषणने महिलेला त्यांच्या संबधतील फोटो आणि व्हिडीओ तिच्या पतीला दाखविण्याची धमकी दिली. भीती दाखवून वारंवार बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले तसेच मारहाण केली. महिलेने पोलीस ठाणे गाठून त्याच्या विरूध्द तक्रार केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी भूषण विरूध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक केली आहे.