लोकसत्ता टीम
नागपूर : नांदेडमध्ये खासदार हेमंत पाटील यांनी अधिष्ठात्यांना चक्क स्वच्छतागृह स्वच्छ करायला लावले. त्यामुळे नागपुरातील मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरूवारी पदवी व पदव्यूत्तर डॉक्टरांसह परिचारिकांनी निदर्शने केली होती. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी संतप्त वैद्यकीय शिक्षकांनीही खासदारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) अधिष्ठाता कार्यालय परिसरात शुक्रवारी दुपारी १२ वाजता दरम्यान महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. समिर गोलावार, महासचिव डॉ. अमित दिसावाल, उपाध्यक्ष डॉ. रमेश पराते यांच्या नेतृत्वात सगळे शिक्षक एकत्र आले. त्यांनी खासदार हेमंत पाटील यांना वैद्यकीय शिक्षक वा अधिष्ठात्यांचा अपमान करण्याचा हक्क नाही. त्यांचा निषेध असो.., शिक्षकांचा अपमान आता सहन करणार नाही, हम सब एक है, असे नारे लावत या प्रकरणात दोषी खासदारावर कारवाईची मागणी केली. खासदारावर योग्य कारवाई न झाल्यास आंदोलन आणखी तिव्र करण्याचा इशारा याप्रसंगी दिला गेला. आज वैद्यकीय शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार आहेत.
आणखी वाचा-बुलढाणा: डोळ्यात मिरची पूड टाकून युवकाचे अपहरण
आंदोलनात डॉ. जयेश मुखी, डॉ. उदय नारलेवार, डॉ. गौर, डॉ. मुखर्जी, डॉ. देशपांडे आणि इतरही अनेक शिक्षक उपस्थित होते. दरम्यान गुरूवारी येथे निवासी डॉक्टरांची मार्ड, पदवीच्या विद्यार्थ्यांची असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंट्रन्स महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनांनीही अधिष्ठात्यांच्या अपमानाविरोधात निदर्शने केली होती.