हाफकीनकडून खरेदीचा घोळ कायम
महेश बोकडे, नागपूर</strong>
शासकीय रुग्णालयांतील औषध खरेदीचे अधिकार हाफकीनकडे दिल्यापासून सर्व विमा रुग्णालयांमध्ये निम्म्याहून अधिक औषध संपले आहेत. अनेक महिन्यांपासून औषध खरेदी झाली नाही. आता हाफकीनने रुग्णालय प्रशासनाला पत्र पाठवून १७ प्रकारच्या औषध खरेदीची प्रक्रिया शेवटच्या टप्यात असल्याचे कळवले आहे. त्यामुळे इतर आवश्यक २०६ प्रकारच्या औषध खरेदी केव्हा होणार? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
विदर्भातील कारखाने, लघु, मध्यम प्रकारातले उद्योग आणि खासगी प्रतिष्ठानांमध्ये काम करणाऱ्या दोन लाख कामगारांच्या उपचारासाठी नागपूरचे सोमवारपेठेतील राज्य कामगार विमा रुग्णालय हे एकमात्र ठिकाण आहे. हे रुग्णालय सुसज्ज असणे अपेक्षित असताना येथे साधनसुविधा,अपुरे मनुष्यबळ आणि उपचार यंत्रांच्या अभाव दिसतो. त्यातच गेल्यावर्षी शासनाने राज्यातील सर्व विमा रुग्णालयांतील औषधांची खरेदी हाफकीनकडूनच करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून हाफकीनने एकही औषध खरेदी केली नसल्याने राज्यातील नागपूरसह १३ विमा रुग्णालयांमध्ये निम्म्याहून अधिक औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
औषधे नसल्यामुळे कामगारांमध्ये रोष वाढल्याने शासनाने रुग्णालय स्तरावर एकूण अनुदानातील १० टक्के निधी स्थानिक स्तरावर औषध खरेदीसाठी वापरण्याची मुभा दिली होती. त्यामुळे नागपूरच्या विमा रुग्णालयाला १५ लाख रुपये मिळाले असले तरी तीन लाख रुपये वगळता इतर सर्व निधी संपला आहे. त्यामुळे ही खरेदीही लवकरच बंद होणार आहे. त्यातच नागपूरच्या विमा रुग्णालय प्रशासने हाफकीनला दीड कोटी रुपयांच्या निधीतून सुमारे २२५ औषधांची खरेदीबाबतची यादी पाठवली होती. परंतु हाफकीनने फक्त १७ औषधांची खरेदी प्रक्रिया झाल्याचे सांगत इतर औषधांबाबत प्रशासनाला काहीही सांगितले नाही.
वर्षांला २.५० कोटींच्या औषध व साहित्याची गरज
सोमवारपेठेतील विमा रुग्णालयाला वर्षांला दोन कोटींची औषध तर ५० लाख रुपयांची सर्जिकल साहित्याची गरज असते. यावर्षी रुग्णालयाला अनुदानापोटी मिळालेल्या दीड कोटींपैकी १.११ कोटी रुपये शासनाच्या सूचनेनुसार प्रशासनाने हाफकीनसाठी राखीव ठेवले आहे, तर १५ लाख रुपयांतून स्थानिक स्तरावर औषध खरेदी होत आहे. मध्यंतरी रुग्णालय प्रशासने अंधेरीतील विमा रुग्णालयाकडून उसनवारीवर औषधे घेतली होती. त्याही अद्याप नागपूरच्या विमा रुग्णालयाला परत करता आल्या नाहीत.
हाफकीनकडून १७ प्रकारच्या औषध खरेदीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाल्याचे पत्र प्रशासनाला मिळाले आहे. लवकरच त्यासाठीचा १८ लाखांचा निधी त्यांना वळता केला जाईल.
– डॉ. मीना देशमुख, वैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विमा रुग्णालय, नागपूर.