नागपूर : बंगालच्या उपसागरातील चक्रकार वाऱ्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले आहे. त्यामुळे या हवामान प्रणालीचा प्रभाव म्हणून राज्यातील पाऊस वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे. मात्र, अद्यापही निम्म्या महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट कायम आहे.
सप्टेंबर महिन्यात पाऊस असला तरीही तो सर्वत्र कोसळणार नाही. त्यामुळे एकंदर राज्यातील बऱ्याच भागात यंदा दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान, हवामान खात्याकडून नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील पावसात सुधारणा होणार असल्याचे सांगण्यात आले. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव म्हणून राज्यातील पाऊस वाढेल. यात प्रामुख्याने कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसतील तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा – नागपूर : प्रियकर-प्रेयसीची गळफास घेऊन आत्महत्या
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या प्रभावामुळे सहा आणि सात सप्टेंबरला विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही भागात चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागकडून वर्तवण्यात आली आहे.