लोकसत्‍ता टीम

अमरावती : पश्चिम विदर्भात पाणीटंचाईची तीव्रता वाढत चालली असून विभागात टँकरग्रस्‍त गावांची संख्‍या शंभरावर पोहचली आहे. सध्‍या १०१ गावांमध्‍ये १११ टँकरच्‍या साहाय्याने पिण्‍याचे पाणी पुरविण्‍यात येत आहे. त्‍यात सर्वाधिक ७८ टँकर बुलढाणा जिल्‍ह्यात सुरू आहेत.

मार्च अखेरीस केवळ बुलढाणा जिल्‍ह्यात २६ गावांमध्‍ये टँकरने पाणी पुरविण्‍याची वेळ आली होती. इतर जिल्‍ह्यांमध्‍ये टँकर सुरू करण्‍यात आले नव्‍हते. पण, आता अकोला वगळता विभागातील इतर चारही जिल्‍ह्यांमध्‍ये टँकर सुरू आहेत. सद्यस्थितीत बुलढाणा जिल्‍ह्यात ७२ गावांमध्‍ये ७८ टँकर, अमरावती जिल्‍ह्यात १३ गावांमध्‍ये १७ टँकर, यवतमाळ जिल्‍ह्यात १४ गावांमध्‍ये १४ तर वाशीम जिल्‍ह्यात २ गावांमध्‍ये दोन टँकरमधून पाणी पुरविण्‍यात येत आहे.

आणखी वाचा- अकोला : पराभवाची परंपरा अबाधित, मात्र जनाधार वाढला, साडेतीन दशकानंतर काँग्रेस…

बुलढाणा जिल्‍ह्यातील सुमारे अडीच लाखांच्‍या वर ग्रामस्थांना पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी टँकरचाच आधार आहे. यामध्ये बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, मोताळा, सिंदखेडराजा आणि लोणार तालुक्यातील एकूण ७२ गावांचा समावेश आहे. दुसरीकडे २२३ गावांमधील गावकरी २५९ अधिग्रहित खाजगी विहिरींवर विसंबून आहेत. मेहकर तालुक्यातील ५० गावांसाठी ५७ , देऊळगाव राजा मधील २८ गावांना ५२, शेगावमधील ७ गावांना ७, मोताळातील १८ गावांना १८, चिखलीतील ४६ गावांना ५३, बुलढाणातील २३ गावांना २५ सिंदखेडराजा मधील ३४ गावांना ३४,लोणार तालुक्यातील १७ गावांना १९ खाजगी अधिग्रहित विहिरीद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे.

अमरावती जिल्‍ह्यातही उन्‍हाची तीव्रता वाढलेली असताना पाण्याचे स्रोत आटल्याने पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. जिल्ह्यातील १३ गावांत १७ खासगी टँकरद्वारे पाणी पुरविण्‍यात येत आहे. याशिवाय ८३ गावांमध्ये ३७ बोअरवेल व ६३ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामुळे २५ हजारांवर नागरिकांना खासगी टँकर व खासगी अधिग्रहित विहिरींद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहेत.

आणखी वाचा-अमरावती : मुख्‍य वनसंरक्षकांच्‍या निवासस्‍थानी चक्क ‘पुष्‍पा’! चंदन वृक्ष…

जिल्ह्यातील ९६ गावांतील हजारो गावकरी खासगी टँकर व खासगी बोअरवेल आणि अधिग्रहित विहिरींद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहेत. पाण्यासाठी हजारो ग्रामस्थांना प्रामुख्याने गृहिणींना भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यातील दोन तालुक्यांतील १३ गावांना १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर, चिखलदरा तालुक्यातील बेला सलोना, मोथा, खडीमल, धरमडोह, आकी, बहादरपूर, गौलखेडा बाजार, आलाडोह, लवादा, गवळीढाणा कोरडा, स्कूलढाणा, कालापांढरी आदी गावांमध्ये १७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दुसरीकडे १४ पैकी ११ तालुक्यांतील ८३ गावांची तहान ६३ अधिग्रहित विहिरी आणि ३७ बोअरवेलवरून भागविली जात आहे.

धरणांमध्‍ये २९ टक्‍के पाणीसाठा

तीव्र उन्‍हाळ्यामुळे पाण्‍याचे बाष्‍पीभवन आणि पाणी वापरही वाढल्‍याने अमरावती विभागातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून सध्‍या मोठ्या, मध्‍यम आणि लघु प्रकल्‍पांमध्‍ये केवळ २९.४१ टक्‍के जलसाठा शिल्‍लक आहे. अमरावती विभागात एकूण ९ मोठ्या प्रकल्‍पांमध्‍ये सध्‍या ४६२ दशलक्ष घनमीटर म्‍हणजे ३३.०६ टक्‍के पाणीसाठा आहे. २७ मध्‍यम प्रकल्‍पांमध्‍ये २४९ दलघमी म्‍हणजे ३२.३९ टक्‍के जलसाठा आहे. एकूण २४५ लघू प्रकल्‍पांमध्‍ये १९३ दलघमी म्‍हणजे २१.२४ टक्‍के पाणीसाठा शिल्‍लक आहे.