नागपूर : आजपर्यंत कधी एखाद्या शिवसेना नेत्याच्या मुलाला प्रवेश द्या किंवा नोकरी द्या म्हणून संपर्क साधला असेल तर सांगा, आताच मंत्रिपदाचा राजीनामा देतो, अशा शब्दात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी त्यांच्यावर हस्तक्षेपाचा आरोप करणाऱ्या कुलगुरूंचा समाचार घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठच्या (बाटू) नागपूर येथील उपकेंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
सामंत म्हणाले, राज्यातील अकृषक विद्यापीठांच्या निर्णयात उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांचा हस्तक्षेप वाढल्याचा आरोप काही निवृत्त कुलगुरूंनी केला आहे. या आरोपाचा सामंत यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग हवा असेल, त्यांच्या स्वत:च्या वेतनाची किंवा कुलसचिवांची थकबाकी असेल तर त्यांना मंत्र्यांची मदत लागते. मात्र, चांगल्या गोष्टीसाठी आम्ही काही सूचना केल्या तर लगेच हस्तक्षेपाचा आरोप होतो. मात्र छत्रपतींच्या राज्यात दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून आपण कायम चांगल्या गोष्टीसाठी हस्तक्षेप करीत राहू.
विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आले आहे. या सुधारणांमुळे राज्य सरकारचा विद्यापीठांमधील हस्तक्षेप वाढेल आणि विद्यापीठांच्या स्वायत्ततेवर गदा येईल, असा आरोप होत आहे. या आरोपाला उत्तर देताना सामंत यांनी कुलगुरूंचाच वर्ग घेतला. सामंत म्हणाले, पुणे विद्यापीठात अनेक वर्षांपासून पडून असलेली छायाचित्रे लावायच्या सूचना केल्या किंवा रानडे इन्स्टिटय़ूटची जागा वाचवण्यासाठी प्रयत्न केला, तर तो शिक्षणमंत्र्यांचा हस्तक्षेप ठरतो का? विद्यापीठ प्राधिकरणांच्या निर्णयात कधी दखल दिली नाही. मला त्या समित्यांवरील सदस्यांची नावेही माहिती नाहीत. असे असतानाही हस्तक्षेपाचा आरोप होणे दुर्दैवी आहे. विद्यापीठात राजकारण होता कामा नये, येथे केवळ विद्यार्थी हाच प्रमुख असायला हवा. ‘बाटू’मध्ये अधिकाधिक महाविद्यालयांचा समावेश कसा करता येईल, यावर भर द्यावा, अशी सूचनाही सामंत यांनी केली.
‘बाटू’ केंद्र फायदेशीर ठरणार
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या एलआयटी येथील सभागृहामध्ये ‘बाटू’चे उपकेंद्र तयार करण्यात आले आहे. नागपूर विभागातील ‘बाटू’मध्ये संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थी आणि महाविद्यालयांना येणाऱ्या अडचणींसाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.