प्रतिनिधी, वर्धा

खासदार रामदास तडस यांची लोकसभा निवडणूकीची उमेदवारी कापल्यास मेघे पितापुत्राचे गावोगावी पुतळे जाण्याची भाषा तेली समाज मेळाव्यात झाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

श्री. संताजी सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे वर्ध्यात तेली समाज उपवरवधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खासदार रामदास तडस, माजी खासदार सूरेश वाघमारे, माजी आमदार राजू तिमांडे, नगराध्यक्ष अतुल तराळे व तेली समाजातील बहुतांश नेतेमंडळी उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपतर्फे तडस यांच्याऐवजी सागर मेघे यांना तिकिट मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर  तडस यांनी त्यांनाच तिकिट मिळण्याची ग्वाही जाहीर सभेतच देणे सुरू केली आहे.

आजचा तेली समाजाचा मेळावा आज मुद्यावर चर्चेत आला. आयोजक संस्थेचे अध्यक्ष अजय वांदिले यांनी हा वाद भाषणातून मांडला. ‘तडस हे महाराष्ट्रातून समाजाचे एकमेव नेते लोकसभेत आहे. त्यांचे काम चांगले आहे. त्यांची तिकिट कापण्याचा प्रयत्न मेघे पितापुत्र करीत आहे. पण हा प्रकार समाज खपवून घेणार नाही. तडस यांची तिकिट पैश्याच्या जोरावर कापल्या गेल्यास दत्ता मेघे व सागर मेघे यांचे पुतळे गावोगावी जाळल्या जातील. अन्याय खपवून घेतल्या जाणार नाही,’ अशा शब्दात वांदिले यांनी भावना व्यक्त केल्या.

शेखर शेंडे यांनी वांदिले यांच्या पुतळे जाळण्याच्या वक्तव्याचे समर्थन करीत प्रथम जात मग पक्ष वगरे पाहू, असे मत मांडले. हा समाजाच्या अस्मितेचा प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर खासदार तडस यांची तिकिट त्यांच्या पक्षाने कापल्यास त्यांनी अपक्ष उभे राहावे असे राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी आमदार राजू तिमांडे म्हणाले.

यावेळी खासदार तडस म्हणाले, ‘२०१४च्या माझ्या विजयात आपल्या समाजाचे निर्णायक अमूल्य योगदान आहे. पण जातीपातीचा भेदभाव न करता मी सर्वांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न या पाच वर्षांत केला. म्हणून लोक आग्रहास्तव मी वर्धा लोकसभेचीच निवडणूक लढणार. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक समाजाचा अध्यक्ष म्हणून मी अनेक विषय मार्गी लावले. संत जगनाडे महाराज यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करणे, तैलिक समाजासाठी मुंबईत स्वतंत्र भुखंड, क्रिडाक्षेत्रात खेळाडूंना मदत, ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा अशा व अन्य प्रश्नांचा पाठपुरावा केला. मध्यंतरी माझ्यावर शस्त्रक्रिया झाल्यावर त्याची खरी माहिती न घेता वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न झाला. पण मी ठणठणीत असून जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. मला पक्षश्रेष्ठी तिकिट देतीलच, असा माझा विश्वास आहे.’

Story img Loader