गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शहर आणि जिल्हा अध्यक्ष पदावरून सुरू असलेला वाद बघता प्रदेश कार्यकारिणीने अनिल देशमुख आणि रमेश बंग यांची अनुक्रमे शहर आणि जिल्हा अध्यक्षपदी निवड केल्यानंतर शरद पवार यांच्या विदर्भ दौऱ्यानिमित्त हा वाद शमला होता. मात्र असे असताना देशमुख यांनी त्यांच्या समर्थकांची नियुक्ती करणे सुरू केल्यानंतर आता पुन्हा गटागटातील राजकारण आणि त्यांच्यातील वाद समोर येण्याची चिन्हे असून तसे कार्यकर्ते उघडपणे बाहेर बोलू लागले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या दौऱ्याचे फलित काय? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून गेल्या चार महिन्यापासून वाद सुरू आहे. तत्कालिन शहर अध्यक्ष अजय पाटील यांना पक्षातील एका गटाने विरोध केल्यानंतर संघटनात्मक निवडणुकीत पक्षाच्या अनेक स्थानिक नेत्यांची नावे समोर आली होती. त्यामुळे गेल्या अनेक दिवस त्यांच्यामध्ये एकमत होत नसल्यामुळे दिवसेंदिवस पक्षातील वाद वाढत होता. राज्यातील पक्षाचे वरिष्ठ नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आदी पक्षाचे नेते नागपुरात आले असताना त्यांच्यामध्ये एकमत झाले नव्हते. त्यामुळे विदर्भात शरद पवार यांचा दौरा असताना आणि त्यांचा मुक्काम नागपुरात राहणार असल्यामुळे शहराला शहर आणि जिल्हा अध्यक्ष राहणार नाही तर ते चांगले दिसणार नाही म्हणून प्रदेश कार्यकारिणीने पक्षाचे दोन ज्येष्ठ नेते असलेल्या अनिल देशमुख आणि रमेश बंग या माजी मंत्र्यांकडे शहर आणि जिल्हा अध्यक्षाची जबाबदारी सोपविली. शरद पवार दौऱ्याच्या एक दिवस नागपुरात आले असताना त्याच दिवशी गटबाजी बघायला मिळाली. पवार नागपुरात राहणार असल्यामुळे ही गटबाजी कमी होईल आणि सर्व गट एकत्र येऊन काम करतील, अशी अपेक्षा होती मात्र त्यांच्या नागपूर कार्यक्रमादरम्यान अनेकदा गटबाजीचे दर्शन घडले. तीन दिवसांपैकी दोन दिवस तर त्यांचा नागपुरात मुक्काम होता. त्यामुळे वेगवेगळे गट त्यांना भेटले. काहींनी ऐकमेकांची उणीदुणी काढत त्यांच्यापुढे तक्रारी केल्याची माहिती समोर आली मात्र त्याबाबत उघडपणे कोणी बोलायला तयार नाही. देशमुख आणि बंग यांच्याकडे तात्पुरती जबाबदारी राहील, असे त्यांच्या विरोघकांना वाटले असताना वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या मेळाव्यात प्रफुल पटेल आणि शरद पवार यांनी दोन्ही नेते अध्यक्षपदी राहून ते राज्यातील अन्य जबाबदारी सांभाळतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे अध्यक्ष बदलण्याचा वाद तुर्तास शमला असला तरी आता शरद पवार विदर्भ दौरा आटोपल्यानंतर पुन्हा एक पक्षातील गटबाजीने डोके वर काढले आहे. अनिल देशमुख यांनी त्यांच्या मर्जीतल्या कार्यकर्त्यांंची विविध पदावर वर्णी लावणे सुरू केल्यामुळे त्यांचे विरोधक उघडपणे नाराजी व्यक्त करू लागले आहे. गटबाजी संपावी आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांनी एकत्र यावे यासाठी पवार यांच्या दौऱ्यादरम्यान प्रयत्न करण्यात आले असले तरी पुन्हा एकदा गटबाजी समोर येण्याची चिन्हे दिसून येत असल्यामुळे पवार यांच्या नागपूर दौऱ्याचे फलित काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

Story img Loader