नागपूर : आंतरराष्ट्रीय बुकी सोंटू ऊर्फ अनंत जैनचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला होता, त्यामुळे त्याच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. सोंटूने सोमवारी प्रथम श्रेणी कनिष्ठ न्यायालयात आत्मसमर्पण केले. गुन्हे शाखा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून मंगळवारी पोलीस कोठडीच्या मागणीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बनावट ऑनलाईन गेमींग अ‍ॅप बनवून देशभरातील हजारो गुंतवणूकदारांची शेकडो कोटींनी फसवणूक करणारा बुकी सोंटू जैन हा नागपूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता. त्याला आतापर्यंत शोधण्यात पोलीस अपयशी ठरले होते. सोंटू हा राज्यातून पसार झाल्यामुळे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता मावळली होती. सोंटूकडे सध्या शेकडो कोटींची संपत्ती असून ती संपत्ती त्याने अनेक नातेवाईक, मित्र आणि नोकरांच्या नावे करून ठेवली आहे. तसेच त्याने कोट्यवधीची रोख रक्कम कुठेतरी दडवून ठेवली आहे. गोंदियातील सोंटू जैनने नागपुरातील तांदूळ व्यापारी विक्रांत अग्रवाल यांची ५८ कोटींनी फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच सोंटू दुबईला पळून गेला होता. सोंटूच्या घरातून १५ किलो सोने, ३०० किलो चांदी आणि १८ कोटींची रक्कम जप्त केली. तसेच जवळपास १०० कोटींची अन्य मालमत्ता जप्त केली.

हेही वाचा – अखेर ‘त्या’ बलात्कार करणाऱ्या आरोपीस अटक; बेलतरोडी पोलिसांनी घेतले ताब्यात

सोंटूने पाण्यासारखा पैसा खर्च करून अटकपूर्व जामीन मिळवला होता. मात्र, त्याचा जामीन सर्वोच्च न्यायालयातून फेटाळल्यामुळे सोंटूकडे दुसरा पर्याय शिल्लक नव्हता. पोलिसांच्या डोळ्यासमोरून नाट्यमयरित्या पळून गेलेला सोंटू जैन सोमवारी दुपारी १ वाजता प्रथम श्रेणी कनिष्ठ न्यायालयात हजर झाला. त्याने आत्मसमर्पण केले. त्याला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा – “तुझं माझं जमेना, पण तुझ्या वाचून करमेना…”, नागपुरात ६९ जोडप्यांचे पुन्हा मनोमिलन

…म्हणून केले आत्मसमर्पण

सोंटू जैनने अनेकांची लुबाडणूक करीत शेकडो कोटी रुपये कमावले. जर सोंटू देशातून पळून गेला असता तर त्याला पैशाचा उपभोग घेता आला नसता. परंतु, आत्मसमर्पण केल्यानंतर काही दिवसांतच तो जामीनावर सुटेल. तसेच कोट्यवधी रुपये खर्च करून पोलिसांच्या तपास प्रक्रियेवर परिणाम पाडू शकतो, तसेच न्यायालयीन लढाईसाठीही शंभरावर कोटी रुपये खर्च करू शकतो. त्यामुळे तो भविष्यात निर्दोषही ठरण्याची शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International bookie sontu jain surrenders in court adk 83 ssb
Show comments