चंद्रपूर : दुबई येथे खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्यावर क्रिकेट सट्टा घेणारे पारस दादाराव उखाडे, अविनाश नारायण हांडे व राकेश अरुण कोंडावार या तीन आरोपींना हॉटेल व्यंकटेश येथे छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. या तीन आरोपींकडून पाच मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले. सट्ट्याच्या पैशांची देवाण-घेवाण झालेली ३८ आंतरराज्यीय बँक खाती आणि त्यातील ६० लाख रुपये गोठवण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींच्या मोबाईलमधून चॅटिंगद्वारे आंतरराष्ट्रीय क्रमांकावर लाखोंचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात राजकीय नेते व पोलिसांच्या आशीर्वादाने क्रिकेट ऑनलाईन सुट्टा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. या व्यवसायात मोठी मंडळी गुंतलेली आहे. यात प्रामुख्याने विविध राजकीय पक्षांतील दुसऱ्या फळीतील नेत्यांचा समावेश आहे. भारत व न्यूझीलंड यांच्यात दुबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात आला. येथील हॉटेल व्यंकटेश येथे सट्टा घेतला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तेथे छापा टाकून पारस दादाराव उखाडे, अविनाश नारायण हांडे व राकेश अरुण कोंडावार या तीन आरोपींना अटक केली. सायबर पोलिसांच्या मदतीने आरोपींच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही ऑनलाईन सट्टा लावला जात होता, अशी माहिती समोर आली. पोलिसांनी या कारवाईत बेटिंगकरिता वापरल्या गेलेल्या बँक खात्यातील ६० लाखांची रक्कम गोठविली. तिन्ही आरोपी allpanelexch.com, nice7777.fun a nice.45-tech या ऑनलाइन आय.डी. पुरवणाऱ्या साईटवर बेटिंग करत होते. त्यांच्याकडून पाच मोबाईल व टीव्ही असा एकूण १ लाख ७६ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला.

प्राथमिक तपासात वरील आरोपी यापूर्वी सुध्दा ऑनलाइन क्रिकेट बेंटिगमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे. विविध लोकांना आय.डी. पासवर्ड देऊन बेटिंगच्या पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी एकूण ३८ वेगवेगळी बँक खाती ते वापरत होते. त्यापैकी काही खाती परराज्यातील आहेत. ही सर्व बँक खाती पोलिसांनी तपासादरम्यान गोठवली. काही आंतरराष्ट्रीय क्रमांकावरसुद्धा आरोपींकडून ऑनलाइन क्रिकेट बेंटिंग झाल्याचे दिसून आले. यात लाखो रुपयांचा व्यवहार झाल्याचे चॅटिंगमधून स्पष्ट होते. सायबर पोलिसांकडून आरोपींच्या मोबाईलची तपासणी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार करीत आहेत.

पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह

काही दिवसांपूर्वी तीन युवकांनी पोलीस शिपाई दिलीप चव्हाण यांची हत्या केली. यामुळे पोलिसांवर सर्व बाजूंनी टीका होत आहे. राजकीय नेते व पोलिसांच्या आशीर्वादाने जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढली, अशी टीका होत आहे. ही कारवाई पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी केली. मात्र, त्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक मंगळवारी सायंकाळी काढण्यात आले. यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.