रामटेक संस्कृती विद्यापीठाचे स्थलांतर करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
नागपूर जिल्ह्य़ात वर्धा मार्गावरील काळाडोंगरी भागात कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठासाठी ५४.१७ हेक्टर म्हणजे ५० एकर जागा देण्यात आली असून तेथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्कृत विद्यापीठाची निर्मिती होणार असली तरी रामटेकचे संस्कृत विद्यापीठ मात्र तेथून हलविण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
कालिदास महोत्सवात पर्यटन विभाग आणि नागपूर फोटो जर्नालिस्ट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून रामटेकचे संस्कृत नागपूरला हलविण्यात येणार असल्याची चर्चा असताना कालिदास महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार मल्लिकाज्रु्रन रेड्डी यांनी त्याबाबत खंत व्यक्त केली होती. या संदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले, कालिदास स्मारक आणि रामटेकचे एक वेगळे नाते असल्यामुळे त्या ठिकाणाहून संस्कृत विद्यापीठ हलविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे या चर्चांमध्ये काहीच तथ्य नाही. वर्धा मार्गावर काळाडोंगरी या भागात ५० एकर जागा देण्यात आली आहे. त्या जागेवर संस्कृत विद्यापीठाची सुसज्ज आणि अत्याधुनिक पद्धतीने इमारत बांधण्यात येणार आहे. मात्र त्या ठिकाणी काय राहणार आहे, याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे देऊ शकतील. शासनाकडून केवळ जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, तेथे काय राहणार याबाबत मात्र माहिती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या पाच वर्षांपासून खंडित झालेला कालिदास महोत्सव पुन्हा सुरू करण्यात आला असून यावेळी या महोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्यात आले आहे. विदर्भात र्पयटन आणि जुना ऐतिहासिक ठेवा असून त्याचे जतन करण्यासोबतच त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टीने हा महोत्सव असून आंतरराष्ट्रीय पातळीवर हा महोत्सव नेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अनेक पुरातत्व वास्तूंना या निमित्ताने उजाळा देण्यात आला आहे. व्याघ्र प्रकल्पासोबत हेरिटेज शहर म्हणून या शहराला लौकिक मिळेल, असेही फडणवीस म्हणाले.
विविध भाषांचे केंद्र होणार : डॉ. उमा वैद्य
नागपूरजवळ होणाऱ्या ५० एकरातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्कृत विद्यापीठाच्या नव्या इमारतीत अकादमी विद्यालयासोबत संग्रहालय, विविध भाषांचे केंद्र आदी बाबी होणार आहे. रामटेकमध्ये अकादमीसह संशोधन केंद्र आणि इतर बाबी असतील. परदेशातील नागरिक संस्कृत भाषेचे उत्तमोत्तम आणि सर्वागीण शिक्षण घेण्यासाठी भारतात येतात. त्यामुळे नागपुरात ही सोय निर्माण होण्याच्या दृष्टीने या विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय पातळीवरचा दर्जा राहील. त्या पद्धतीने त्याची निर्मिती होईल, अशी माहिती कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य यांनी दिली.