नागपूर, मुंबई, पुणे, औरंगाबादचा समावेश ; आज जागतिक परिचारिका दिन
महाराष्ट्रातील शासकीय व खासगी रुग्णालयांची संख्या बघता आजही प्रशिक्षित परिचारिकांची कमतरता आहे. रुग्णांचा त्रास थांबवण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने ३० जानेवारी २०१६ मध्ये परिचारिकांसाठीचे १६ वेगवेगळे अभ्यासक्रम नागपूर, मुंबई, औरंगाबाद, पुणे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाला दिला होता. परंतु, अद्याप त्याला मंजुरी न मिळाल्याने हे अभ्यासक्रम शासनाच्या दप्तरात धूळखात पडून आहेत. आज, १२ मे रोजी जागतिक परिचारिका दिन असून, त्या निमित्ताने याकडे लक्ष वेधले आहे.
राज्यातील सगळ्या शासकीय व खासगी रुग्णालयांतील अतिदक्षता विभाग, लहान मुलांचा विभाग, मानसोपचार, कर्करोग, मूत्रपिंड विभाग, हृदयशल्यक्रिया, प्रशासन अशा वेगवेगळ्या क्षेत्रात तज्ज्ञ परिचारिकांची आवश्यकता मोठय़ा प्रमाणात निर्माण झाली आहे. या पाश्वभूमीवर सध्या शासकीय परिचारिका महाविद्यालयांमध्ये केवळ मुलांसाठीचा स्वतंत्र अभ्यासक्रम आहे.
राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागासह वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये विविध स्पेशालिटी विभाग आहेत. तथापि, या विभागात त्या विषयांच्या तज्ज्ञ परिचारिका उपलब्ध नाहीत. परिचारिकांसाठी पीएच.डी.सह अस्थीव्यंग, शस्त्रक्रिया विभागातील प्रशिक्षण, एमफील, नेत्रशल्य चिकित्सा, अत्यावश्यक व आपत्कालीन आदी १८ विषयांच्या अभ्यासक्रमांना मान्यता मिळावी यासाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. यानुसार प्रत्येक विषयासाठी ३० विद्यार्थी क्षमता निश्चित करण्यात आली होती. अंमलबजावणीसाठी पुरेसे अध्यापक व अन्य गोष्टींची तरतूद न केल्यामुळे हा प्रस्ताव गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा