अकोला : शहरातील जुने शहर भागात समाजमाध्यमातील पोस्टवरून शनिवारी रात्री दंगल उसळल्याची घटना शनिवारी रात्री घडली. शहरातील चार पोलीस ठाण्याच्या परिसरात संचारबंदी लागू केली. खबरदारी म्हणून इंटरनेट सेवा रविवार दुपारपासून बंद करण्यात आली आहे. शहरातील परिस्थिती पूर्वपदावर येत असून तणावपूर्ण शांतता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाजमाध्यमावर शनिवारी रात्री एक पोस्ट प्रसारित झाली होती. या पोस्टवरून एका विशिष्ट धर्मीय लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. १०० ते १५० जणांच्या जमावाने रामदासपेठ पोलीस ठाण्यात एकत्र येऊन तक्रार दाखल केली. दुचाकीवरून फिरत जमावाने जोरदार नारेबाजी करून शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. संतप्त जमावाकडून जुने शहरात प्रचंड हैदोस घालण्यात आला.

हेही वाचा – गोंदिया : स्वातंत्र्यानंतरही समतेची कविता लिहावी लागणे देशाचं दुर्दैव; ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद जोशींनी व्यक्त केली खंत

चारचाकी, दुचाकी वाहनांची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली. जमावाने प्रचंड दगडफेकदेखील केली होती. घरे व धार्मिकस्थळावरदेखील हल्ला करण्याचा समाजकंटकांनी प्रयत्न केला. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. पोलिसांनी जमावावर बळाचा वापर केला. या घटनेत हरिहर पेठ येथील एकाचा मृत्यू झाला असून, दोन पोलिसांसह आठजण जखमी झाले आहेत. गंभीर परिस्थिती लक्षात घेत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शनिवारी रात्रीच कलम १४४ लागू करून जुने शहर, रामदास पेठ, शहर कोतवाली व डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या परिसरात संचारबंदी लागू केली.

हेही वाचा – अकोला : संचारबंदीमुळे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

शहरातील बिघडलेले वातावरण लक्षात घेता इंटरनेट सेवा ४८ तासांसाठी बंद करण्यात आली आहे. सर्व कंपन्यांचे इंटरनेट रविवारी दुपारीपासून बंद झाले. त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही भागात एअरटेल कंपनीची इंटरनेट सेवा सुरू आहे. दरम्यान, सोमवारीदेखील संचारबंदीमुळे मुख्य बाजारपेठ बंद आहे. त्यामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Internet service shutdown in akola city a tense silence in the city ppd 88 ssb
Show comments