अमरावती : एका महिलेची ऑनलाइन शेअर खरेदी-विक्री व्यवहारात तब्बल ७४ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला ग्रामीण सायबर पोलिसांनी मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील एका हॉटेलमधून अटक केली. या प्रकरणात नऊ आरोपी पोलिसांना गवसले आहेत. त्यांच्याकडून रोख, मोबाइल व अन्य साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रपरिषदेत दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अटक करण्यात आलेले आरोपी हरियाणा, आसाम, राजस्थान, उत्तर प्रदेश, जोगेश्वरी पश्चिम, मुंबई नागपूर येथील रहिवासी आहेत. लुबाडण्यात आलेल्या ७४ लाखांपैकी ४० लाख रुपये सायबर पोलिसांनी गोठविले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुनील हनुमान (३०), विक्रम जिलेसिंग (४१) दोघेही रा. फतेहबाद, हरियाणा, परान अली जमालउद्दीन (१९) रा. कामृप, आसाम, अमन कुमार प्रेमचंद (५०) रा. जयपूर, राजस्थान, मोहम्मद मरुफ मोहम्मद हमीद (२४), सौरभ बलिंद्रकुमार तिवारी (२३) दोघेही रा. उत्तर प्रदेश, मोहम्मद साबीर असूब शेख (१९), फराज खान आसीफ खान (१९) दोघेही रा. जोगेश्वरी पश्चिम, मुंबई व विमल मानकलाल काटेकर (३१) रा. नागपूर यांचा समावेश आहे. आरोपींकडून १८ मोबाइल, २३ डेबिट व क्रेडिट कार्ड, १८ चेकबुक, इंडिगो विमानाची ६ टिकीटे, स्टँप व २ लाख २८ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात मूळ फसवणुकीच्या गुन्ह्यात गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्यासह अन्य तीन कलमेदेखील वाढविण्यात आली आहेत.

हेही वाचा – राज्यात ६.८४ लाख क्विंटल ज्वारी खरेदी होणार; ‘पणन’च्या वाढीव उद्दिष्टाला…

हेही वाचा – आली चहाची तल्लफ अन् वाचले ४८ वऱ्हाड्यांचे प्राण; बसला अचानक लागली आग, उरला केवळ सांगाडा

मंगरूळ चव्हाळा ठाण्याच्या हद्दीतील पापळ येथील रहिवासी सुमित्रा नामक महिलेची शेअर बाजाराशी संबंधित समाज माध्‍यमांवरील एका समुहावर ७४ लाख १९ हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली होती. शेअर व्‍यवहाराकरिता त्यांनी ती रक्कम पाठविली. त्यानंतर त्या सायबर लुटारूंनी सांगितल्याप्रमाणे शेअर खरेदी व विक्री करीत होत्या. त्यावर होणारा नफा त्यांच्या इन्स्टट्यिूशनल अकाउंटमध्ये दिसत होता. त्यांनी त्यातील रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रक्कम काढता आली नाही. त्यामुळे त्यांनी कस्टमर केअर क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोदेखील बंद येत होता. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सुमित्रा यांनी सायबर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करून सायबर ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरेंद्रसिंग बिलवाल यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने फसवणूक करणाऱ्या टोळीचे तांत्रिक विश्लेषण आणि तपास सुरू केला. त्यावेळी भारताबाहेर विविध देशात बसून काही व्यक्तींचा समूह संगनमत करून अशाप्रकारे गुन्हे करण्यास प्रवृत्त करून गुन्ह्याचा कट करत असल्याचे समोर आले. मुंबईतील अंबोली ठाण्याच्या हद्दीतील जोगेश्वरी पूर्व भागातील एका महागड्या हॉटेलमध्ये बसून काहीजण भारतभर फसवणूक झालेली रक्कम मुख्य आरोपीपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत असल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. थेट विमानाद्वारे मुंबईत येऊन ते त्या हॉटेलमध्ये थांबलेल्या आरोपींशी संबंध असल्याचे समोर आले. त्यानुसार, सायबर पोलिसांनी मुंबई गाठून त्या हॉटेलमधून नऊ आरोपींना अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interstate gang of cyber robbers busted from mumbai jogeshwari including nine accused mma 73 ssb
Show comments