गुन्हे शाखेतील पोलीस असल्याची बतावणी करून वरूड येथील एका वृद्धाला लुटणाऱ्या तोतया पोलिसाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीडमधून जेरबंद केले. हसनी अली ऊर्फ आजम अली इराणी (३२, रा. इराणी मोहल्ला, शिवाजीनगर, परळी वैजनाथ, बीड) असे अटक आरोपीचे नाव आहे. तपासादरम्यान, तो आंतरराज्यीय इराणी टोळीचा सदस्य असल्याचे स्पष्ट झाले असून, त्याने वरूड येथील घटनेची कबुली दिली आहे. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्याला मध्य प्रदेशातील रिवा शहरातून अटक केली.
हेही वाचा >>>अमरावती विभागात ‘ओला दुष्काळ’ जाहीर होण्याची प्रतीक्षा, शेतकरी हवालदिल
वरूड ठाण्याच्या हद्दीतील झोलंबा येथील सुभाष बद्रे (६७) हे ३० सप्टेंबर रोजी वरूड येथून बाजार करून परतत असताना बाजारात दुचाकीहून आलेल्या तिघा-चौघांनी त्यांना आम्ही गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे सांगितले. समोर खून झाला असून, लूटमार सुरू असल्याची बतावणी करून त्यांच्याकडील ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी हातचलाखीने काढून घेतली आणि घटनास्थळावरून पसार झाले. याबाबत वरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणातील आरोपी हा वयोवृद्धांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय इराणी टोळीतील सदस्य असून, तो मूळचा परळी वैजनाथ येथील असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. तो मध्य प्रदेशातील रिवा येथे असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली. आरोपीकडून वरूड येथे वाटमारी करतेवेळी वापरलेली दुचाकी, दिल्ली क्राईम ब्रँचचे पोलीस म्हणून असलेले बनावट ओळखपत्र, मोबाइल असा एकूण ९३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.