नागपूर : कर्नाटकातील सीमावर्ती भाग केंद्रशासित करण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी विधान भवन परिसरात केली. पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, सीमाभागाचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे केंद्राने हा भाग केंद्रशासित करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका मांडण्याची गरज आहे.
आज सभागृहात हा प्रस्ताव सरकारने मांडल्यावर आम्ही त्याला समर्थन दिले. परंतु ज्या पद्धतीची कठोर भूमिका घेणारा प्रस्ताव अपेक्षित होता, तसा तो नव्हता. दरम्यान भाजपने २०१४ च्या निवडणूक पूर्व जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात राज्य आणि केंद्रात भाजपचे सरकार आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरच्या जाहीरनाम्यात कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. त्यामुळे भाजपच्या सातत्याने घेतल्या जाणाऱ्या भूमिकेवर नाना पटोले यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.