अकोला: अकोला शहरातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणातील आरोपीची कसून चौकशी करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांना पत्राद्वारे दिले.
शहरातील खदान परिसरात गुंडप्रवृत्तीच्या व व्यसनाधीन आरोपीने पीडित मुलीला सिगारेटचे चटके देत तिच्यावर अत्याचार केला. तिचे मुंडण करून सार्वजनिकस्थळी विवस्त्र करून अत्याचार केले. हा प्रकार अत्यंत अमानवी असून माणुसकीला काळिमा फासणारा आहे, अशा शब्दात डॉ. गोऱ्हे यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांना चौकशीचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा… इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट, बुलढाण्याच्या बोरी अडगावमध्ये तणाव; टायर जाळून…
पीडित अल्पवयीन मुलीला मनोधैर्य योजनेतून ताबडतोब मदत देण्यात यावी, तसेच पीडितेच्या पुनर्वसनासाठी तिला सहकार्य करावे, आरोपीला जामीन मिळू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, आरोपीची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी असल्याने या घटनेशी संबंधित आरोपी आणि त्याचे साथीदार व इतर धागेदोरे याबाबत कसून चौकशी करत त्यांच्या विरोधातील सर्व पुरावे गोळा करावे, लवकरातलवकर आरोपपत्र दाखल करावे, या प्रकरणासाठी सक्षम सरकारी वकील देण्यात यावा, आदी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केल्या आहेत.