अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी महानगर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या टॉवर चौक शाखेसमोर सोमवारी दुपारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाने ७० वर्षांत कमावलेली संपत्ती त्यांचे मित्र अदानी यांना देण्याचा सपाटा लावलेला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी देशातील जनतेने मोठ्या कष्टाने कमावलेला व भविष्याची तरतूद म्हणून एसबीआय, एलआयसीमध्ये गुंतविलेले हजारो कोटी रुपये अदानीच्या कंपनीला दिले. आता हे हजारो कोटी रुपये बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. तरीही केंद्र सरकार गप्प बसले आहे, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला.
हेही वाचा – नागपूर : अतुल लोंंढे यांचे उद्या अर्थसंकल्पावर व्याख्यान
अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी करावी, जनतेचा पैसा सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना करावी आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी प्रदेश सचिव प्रकाश तायडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, मनपाचे माजी विरोधी पक्ष नेता साजिद खान पठान आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.