वर्धा : सहकारी संस्थेत चालणारा सावळा गोंधळ नवा नाही. त्यातही लहान सहकारी संस्था तर गाव पुढाऱ्यांच्या अजब कारभाराने चर्चेत असतात. लगतच्या आंजी विशाल विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत चालणारा घोळ आता चर्चेत आला आहे. या संस्थेने आठ वर्षांपूर्वी स्वतंत्र व्यवसाय म्हणून पतसंस्था स्थापन केली. भागभांडवल जून्याच शेतकरी सदस्यांचे होते. मात्र पुढे या पतसंस्थेने एकाही सभासदास पत पुरवठा केला नाही. तसेच थकीत कर्ज वसुलीची रक्कम जिल्हा बँकेत जमा केल्या जात नव्हती.
नवे खाते आंजी येथील महाराष्ट्र बँकेत उघडून व्याजाची रक्कम जमा केल्या जात होती. घोळ म्हणजे या रकमेवरील येणाऱ्या व्याजातून संचालक मंडळ स्वतःच्या जाहिरात देण्यावर खर्च करायचे. संस्थेचा जमाखर्च, नफातोटा पत्रक, ताळेबंद पत्रक व अश्या अन्य व्यवहाराची कसलीच नोंद वार्षिक अहवालात झालेली नाही. यामुळे मोठा आर्थिक घोळ झाल्याची ओरड सुरू झाली होती.
हेही वाचा – नागपूर : छायाचित्रकाराला मारहाण करून पोलिसांनी उकळले ६० हजार?
तक्रार झाल्यावर संस्थेच्या काही सदस्यांनी लेखा परीक्षण करण्याचा आग्रह धरला. मात्र वारंवार मागणी करूनही तो देण्यात आला नाही. शेवटी प्रकरण तालुका दंडाधिकारी यांच्याकडे गेले. त्यांनी रेकॉर्ड जप्त करण्याचे आदेश दिले. या आदेशावर खरांगना पोलिसांनी अंमल करीत संस्थेचा संपूर्ण रेकॉर्ड जप्त केला आहे. लेखा परीक्षक एस.डी. धकाते व निरीक्षक पी.एम. निमजे यांच्या ताब्यात तो रेकॉर्ड आहे. या चौकशीतून झालेला घोळ पुढे येईल, असा गावकऱ्यांना विश्वास आहे.