चंद्रपूर : Santosh Rawat firing case जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊनकर यांच्यासह त्यांचा नोकर तथा बँकेच्या काही संचालकांची चौकशी केल्याने बँकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या ११ मे रोजी रावत यांच्यावर अज्ञात हल्लेखोराने मुल येथे गोळीबार केला होता. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. हल्लेखोराने वापरलेल्या वाहनाची नंबर प्लेट बनावट असल्याने हल्लेखोरापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाहीय.
हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला की वैयक्तिक वादातून, हे स्पष्ट झाले नाही. पोलीस प्रशासनाने शुक्रवारी काही संशयितांना पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली. त्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षांसह काही संचालकांचा समावेश आहे. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. आता हे प्रकरण कोणते वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलीस या प्रकरणाचा तीन वेगवेगळ्या दिशेने तपास करीत आहेत. हा हल्ला एखाद्या बड्या राजकीय नेत्याने किंवा रावत यांनीच घडवून आणला नाही ना, व्यावसायिक स्पर्धेतून तर हल्ला झाला नाही ना, याबाबत पोलीस तपास करीत आहे.