बुलढाणा : ‘अन्नत्याग’ कायम ठेवून शेतकरी नेते रविकांत तुपकर शेकडो शेतकऱ्यांसह मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी आज, मंगळवारी बुलढाण्याहून मुंबईकडे रवाना झाले. जेमतेम दीड तासांतच बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर त्यांना शासनासोबतच्या बुधवारच्या बैठकीचे निमंत्रण प्राप्त झाले.
न्यायालयाने जामिनावर सुटका केल्यावर तुपकर यांनी सोमठाणा (ता. चिखली) येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले. एल्गार आंदोलन कथितरीत्या दडपल्याच्या निषेधार्थ अन्नत्याग सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पूर्वघोषित कार्यक्रमानुसार आज, मंगळवारी दुपारी १ वाजता तुपकरांसह कार्यकर्ते, शेतकरी यांच्या वाहनांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला. दरम्यान, नाट्यमय घडामोडीत बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील जांब या गावात खास निरोप घेऊन अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ दाखल झाले. जिल्हाधिकाऱ्यांचा खास निरोप घेऊन हे अधिकारी आले होते.
अपर जिल्हाधिकारी विंचनकर, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, बुलढाणा उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंह जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे अशोक लांडे हे खास ‘खलिता’ घेऊन आले. जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या पत्रात सोयाबीन-कापूस आंदोलनप्रकरणी २९ नोव्हेंबरला सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तुपकरांसोबत बैठक लावण्यात आल्याचे नमूद आहे. यामुळे तुपकरांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती करण्यात आली.
हेही वाचा – माजी मंत्री सुनील केदार आरोपी असलेल्या जिल्हा बँक घोटाळा प्रकरणाचा निकाल पुढे ढकलला
हेही वाचा – हिंगोलीच्या सभेला का गेलो नाही, वडेट्टीवार स्पष्टच बोलले
निमंत्रणावर काय म्हणाले तुपकर?
या शासकीय शिष्टाई व पत्राबद्दल तुपकरांनी सहकाऱ्यांसमवेत चर्चा केली. बुधवारची बैठक यशस्वी झाल्यावरच अन्नत्याग मागे घेऊ, असा निर्णय त्यांनी जाहीर केला. यानंतर तुपकर आणि सहकारी पुढील प्रवासासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले.