अमरावती : नैसर्गिक आपत्‍तीने झालेले नुकसान आणि त्‍यातच शेतमालाला योग्‍य भाव मिळत नसल्‍याने शेतकऱ्यांमध्‍ये निराशेचे वातावरण असून गेल्‍या वर्षभरात राज्‍यात सर्वाधिक शेतकरी आत्‍महत्‍या अमरावती विभागात झाल्‍या आहेत. नैसर्गिक कारणांमुळे घटलेली उत्पादकता, बांगलादेशकडून आयात शुल्कात वाढीच्या परिणामी घसरलेले दर यामुळे हतबल झालेल्या जरूड येथील शेतकऱ्याने घराबाहेर पडत मजुरीचा निर्णय घेतला. परंतु तेथेही निराशाच हाती आल्याने हतबलतेतून चंद्रपूर जिल्ह्यातील एका विहिरीत उडी घेत आपले जीवन संपविले. या शेतकऱ्याच्‍या दशक्रिया कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रातील सर्व मंत्री आणि लोकसभा, राज्‍यसभा सदस्‍यांना आमंत्रित करण्‍यात आले आहे. ही आमंत्रण पत्रिका सध्‍या समाजमाध्‍यमांवर प्रसारीत झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वरूड तालुका संत्री उत्‍पादक शेतकऱ्यांनी ही आमंत्रण पत्रिका तयार केली आहे. काही दिवसांपूर्वी जरूड येथील पद्माकर बापुराव दारोकर (वय ४८) यांनी आत्‍महत्‍या केली होती. जेमतेम दीड एकर शेतीवर त्‍यांच्‍या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. त्‍यांच्‍या शेतात संत्र्याची बाग आहे. पण, यंदा सुरुवातीला त्‍यांना फळगळतीचा सामना करावा लागला. त्‍यानंतरच्‍या काळात वाचलेल्‍या फळांना चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा असताना बांगलादेशने आयात शुल्‍कात वाढ केल्‍याने त्‍याचा फटका संत्री उत्‍पादकांना बसला. संत्र्याचे भाव कोसळले, त्‍यामुळे पद्माकर दारोकर यांच्‍या अडचणीत आणखी भर पडली. त्‍यामुळे त्‍यांनी बागेतील फळांचा व्‍यवहार केला नव्‍हता. काहीतरी काम करून पैशांची गरज भागविण्‍याचे आणि नंतर दरात तेजी आल्‍यावर बागेचा व्‍यवहार करण्‍याचे ठरवून ते चंद्रपूर जिल्‍ह्यात रोजंदारीच्‍या कामासाठी पोहोचले, पण तेथेही काम न मिळाल्‍याने त्‍यांनी चंद्रपूर जिल्‍ह्यातील पिंपळगाव येथील एका शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्‍महत्‍या केली होती.

हेही वाचा – पावसाचा मुक्काम वाढणार… वाचा तुमच्या गावात कसे असेल वातावरण?

हेही वाचा – नागपूर : कारागृहाबाहेर हालचाली वाढल्या, आमदार सुनील केदार लवकरच…

संत्री विकली जात नसल्‍याने जरूड येथील शेतकरी पद्माकर दारोकर यांनी आत्‍महत्‍या केली असून गावकरी शेतकऱ्यांनी १२ जानेवारी रोजी दशक्रियेचा कार्यक्रम करण्‍याचे ठरविले आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, सर्व मंत्री, लोकसभा, राज्‍यसभा सदस्‍य आणि आयात-निर्यात धोरण ठरविणाऱ्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती प्रार्थनीय असल्‍याचे आमंत्रण पत्रिकेत म्‍हटले आहे. या पत्रिकेची सध्‍या चांगलीच चर्चा आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Invitation to pm modi for dashakriya an orange manufacturer farmer committed suicide mma 73 ssb