लोकसत्ता टीम
अकोला : दिवंगत मनसैनिक जय मालोकार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यामुळे मनसेच्या आढावा बैठकीत त्याला जाब विचारला गेला व वाहन तोडफोड प्रकरणांत गुंतवले गेले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. शर्टाच्या बटनालाच हात लावून दाखवावे, असे प्रत्युत्तर देखील मिटकरी यांनी मनसेचे नेते अमेय खोपकरांना दिले.
अकोल्यात माध्यमांशी ते बोलत होते. राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यावरून मनसे आणि अमोल मिटकरी यांच्यात वाद चांगलाच चिघळला आहे. अजित पवार पुण्यात नसतानाही येथील धरणे भरल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्या टीकेला आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे ‘सुपारीबहाद्दर’ असल्याची टीका त्यांनी केली होती. यातून अमोल मिटकरी यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी १३ मनसेच्या पदाधिकारी व मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला.
आणखी वाचा-भंडारा : ग्राहक मंचाचा दणका! फसवेगिरी, सदनिका विक्री प्रकरणात माजी नगरसेवक…
दरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावर हल्ला प्रकरणात सहभागी मनसैनिक जय मालोकार यांचा त्याच दिवशी हृदयविकाराचा तीव्र झटक्याने मृत्यू झाला. यावरून आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी आज पुन्हा एकदा मनसेवर तोफ डागली. ते म्हणाले, मनसेचे सरचिटणीस व जिल्हाध्यक्षाने चिथावणी दिल्यामुळेच जय मालोकार तेथे आला होता. काही दिवसांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेण्याच्या जय मालोकार याच्या हालचाली सुरू होत्या. आमच्या जिल्हाध्यक्षांसोबत त्याचे बोलणे झाले होते.
अजित पवार यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांसह मुंबई येथे प्रवेश घेण्याची त्याची इच्छा होती. मनसे पदाधिकाऱ्यांच्या मनात त्याची खुन्नस होती. आढावा बैठकीत त्याला जाब विचारण्यात आले. त्यानंतर त्याला वाहन तोडफोड प्रकरणात गुंतवण्याचा प्रयत्न केला गेला. दगड घेऊन गाडी मारण्यासाठी प्रवृत्त केल्या गेले. मात्र, तो सज्जन असल्याने त्यात सहभागी झाला नाही. त्यामुळे या लोकांनी त्याला पुढे कुठे नेले, त्याच्या सोबत काय केले, हे त्याच्या कुटुंबाला कळले पाहिजे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. यातून धक्कादायक माहिती समोर येईल.’
आणखी वाचा-रेल्वे प्रवासाचा बेत आखताय? मग, आधी हे वाचाच… कारण, तब्बल ३२ गाड्या…
अमेय खोपकर यांच्या टीकेला देखील त्यांनी प्रत्युत्तर दिले. अमेय खोपकर माझ्या शर्टाच्या बटनाला देखील हात लावू शकत नाही, असे अमोल मिटकरी म्हणाले. मनसे सारख्या पक्षात पालकांनी आपल्या तरुण मुलांना पाठवू नये, असे आवाहन देखील त्यांनी केले.