यवतमाळ : जिल्ह्यात घडणार्या खून, प्राणघातक हल्ले, मारहाण, अत्याचारासह चोरीच्या घटनांमध्ये विधीसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग लक्षणीय वाढला आहे. जिल्ह्यातील कुख्यात चोरट्यांकडून विविध गुन्ह्यांत विधीसंघर्षग्रस्तांचा वापर पोलिसांनाही कारवाई करताना अडचणीचा ठरत आहे. बाभूळगाव तालुक्यातील खडकसावंगा येथे पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात शिरून कपाटातील सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीच्या घटनेचा उलगडा पोलिसांनी नुकताच केला.
या घटनेत दुर्गाबेन लालजी ठाकोर (३६), रेणुकाबेन रमेशभाई पटेल (२०, दोघीही रा. बांगरनगर) या महिलांसह एका अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली. जिल्हाभरात घडणार्या इतरही चोरीसह इतर गंभीर गुन्ह्यात विधीसंघर्षग्रस्त बालकांचा मोठ्या हुशारीने वापर करण्याचा कल वाढला आहे. कौटुंबिक कारणे आणि अल्पावधीत श्रीमंत होण्याची ओढ यातून शाळकरी मुलेही वाममार्गालाही लागत आहेत. विभक्त कुटुंब पद्धतीत पालकांचे मुलांकडे लक्ष नसणे, हे सुद्धा मुले बिघडण्याचे कारण आहे.
हेही वाचा >>> वरळीमध्ये कोयत्याने हल्ला करून एकाची हत्या
विधिसंघर्षग्रस्त बालक कमी वयाचे असल्याने त्यांना कायद्यापासून संरक्षण मिळते. गुन्हा केल्यावर आपल्याला काहीच होत नाही, ही भावना अल्पवयीन मुलांत जाणीवपूर्वक रुजविली जात आहे. यवतमाळ जिल्ह्यात मागील सात महिन्यातील पाच खूनप्रकरणात १४ तर तीन प्राणघातक हल्ल्यात तीन विधिसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश उघड झाला आहे. अवघ्या दोन महिन्यात झालेल्या तीन मोठ्या चोरीच्या घटनांत तीन विधीसंघर्षग्रस्त बालके अडकली आहेत. पोलीस कारवाई करून या मुलांना सुधारगृहात पाठवतात. गुन्ह्यांच्या तुलनेत शिक्षेची तरतूद सौम्य असल्याने बालकांचा गुन्हेगारी घटनांत वापर वाढत असून हा सामाजिक चिंतेचा विषय होत आहे.
नवीन दुचाकीसाठी…..
यवतमाळातील कॉटन मार्केट परिसरात एका घरी घरफोडीची घटना घडली होती. ही चोरी कुख्यात म्हणून ओळख असलेल्या दोघांनी केली होती. त्यांच्यासोबत एक विधीसंघर्षग्रस्त बालकही होता. त्याच्याकडून होणारा अवास्तव खर्च नागरिकांच्या लक्षात आल्याने या चोरीचे बिंग फुटले. पांढरकवडा येथील एका कपडा दुकानात कामाला असणार्या अल्पवयीन मुलाच्या डोक्यात नवीन दुचाकी घेण्याची कल्पना आली. त्याने चक्क दुकानातून दीड लाख रुपयाच्या रोकडवर हात साफ केला.