नागपूर : दंगलीत इरफान अन्सारी याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात तहसील पोलिसांनी घरात अठराविश्वे दारिद्र्य आणि कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या संतोष गौर याला अटक केली. मात्र, दंगलीत इरफानला मारणारे वेगळेच होते. संतोष गौर याला ‘बळीचा बकरा’ बनवले जात आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
१७ मार्चला रात्री नागपुरातील महाल भागात दोन गटात दंगल झाली. दोन्ही गटातील युवकांनी परस्परांवर दगडफेक केली. यादरम्यान इरफान अन्सारी (३८, बंदे नवाजनगर) हा वेल्डिंगचे काम करणारा मजूर इटारसीला जाण्यासाठी रेल्वेस्थानकाकडे निघाला होता. वाटेत ४० ते ५० युवकांनी इरफानवर हल्ला केला. इरफानला बेशुद्ध अवस्थेत मेयो रुग्णालयात दाखल केले होते. शनिवारी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर तहसील पोलिसांनी संतोष गौरसह अन्य युवकांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यापैकी संतोषला अटक केली. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
संतोषचे शरीरच कमकुवत
संतोष हा गेल्या सहा वर्षांपासून कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. त्याला व्यवस्थित चालताही येत नाही. शरीर कमकुवत असल्यामुळे तो लगेच थकतो. त्याला पोलिसांनी राजकीय दबावातून ‘बळीचा बकरा’ केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तो ‘भाईसाहब’ कोण?
आजारी संतोष गौर लहान मुलाला शोधण्यासाठी घराबाहेर पडला होता. दरम्यान, त्याची कुणाशीतरी भेट झाली. संतोष मुलाला घेऊन रात्री घरी आला. त्यावेळी कुणीतरी ‘भाईसाहब’ घरी आले. दोघांनी चर्चा केली. काही वेळानंतर तहसील पोलिसांचे पथक घरी आले. संतोषला चौकशीसाठी नेत असून तासाभरात घरी पाठवून देतो, असे खोटे सांगून सोबत नेले. त्यानंतर त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. ‘ संतोषने भाईसाहब’चे ऐकले नसते तर ही वेळ आली नसती, अशी माहिती संतोषची पत्नी राणी यांनी दिली. त्यामुळे हा भाईसाहाब कोण, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
संतोषने खून केला नाही
माझे पती गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरने ग्रस्त आहेत. तेे पूर्वी गुप्ता गुलाबजामूनवाला या हॉटेलमध्ये काम करीत होते. मात्र, आता त्यांनी कर्ज घेऊन ई-रिक्षा घेतली. यातून कमावलेले पैसे त्यांच्या उपचारात खर्च होतात. आम्हाला तीन मुले असून मी चार घरची धुणी-भांडी करते. त्यावरच आमचा उदरनिर्वाह चालतो. माझ्या पतीची शारीरिक स्थिती कोणावर हल्ला करण्यासारखी नाही. त्यांनी खून केला नाही. त्यांना फसवण्यात आले आहे. राणी गौर, संतोषची पत्नी.
दंगलखोराला जात-पात नसते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करताना कोणताही भेदभाव करू नये. प्रत्येक दंगलखोरांवर सारखीच कारवाई व्हायला हवी. बुलडोझर चालवायचाच असेल तर फहीम खान, अब्दुल हफिजसह संतोष गौरच्याही घरावर तो चालायला हवा.