नागपूर : एसटी कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकतेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने याबाबतची प्रक्रिया संगणकाद्वारे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बदली प्रक्रियेत अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप कमी होऊन गैरप्रकाराला आळा बसण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळात पूर्वी विभागीय स्तरावरील बदल्या विभाग नियंत्रक कार्यालय, प्रादेशिक स्तरावरील बदल्या प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय, इतर बदल्या मुंबईतील केंद्रीय कार्यालय स्तरावर व्हायच्या. या प्रक्रियेत अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप होत असल्याने मर्जीतील कनिष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांना इच्छेनुसार पदस्थापना दिली जाते, असा आरोप कामगार संघटनेकडून केला जायचा. तर संघटनेच्याही पदाधिकाऱ्यांना चांगल्या ठिकाणी पदस्थापना मिळत होती. त्यामुळे ही बदली प्रक्रिया नेहमी वादात राहत होती.

महामंडळाने हा गैरप्रकार थांबवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे संगणकीकरणाचे काम मे. चेन-सिस (इंडिया) प्रा. लि. या संस्थेला दिले आहे. या संस्थेने प्रशासकीय, विनंती बदल्यांसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेबाबतची लिंक राज्यातील सर्व कार्यालयांना उपलब्ध केली आहे. सोबतच संस्था व महामंडळाने संगणकीय प्रणालीद्वारे बदल्यांबाबतची प्रक्रिया कशी राबवावी, याबाबत सूचनाही केली आहे. एसटीचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभणे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

हेही वाचा : लोणार सरोवरावर धुक्याची चादर

बदलीबाबतची प्रक्रिया कशी?

कर्मचारी, अधिकाऱ्यांची माहिती सेवापुस्तकातील नोंदीनुसार संगणक प्रणालीमध्ये बिनचूक समाविष्ट करायची आहे. कर्मचाऱ्याच्या विनंती बदलीचा अर्ज, वैद्यकीय दाखले, पती-पत्नी यांचे शासकीय सेवेत कार्यरत असल्याबाबतची कागदपत्रे, इतर माहितीही संगणकीय प्रणालीवर असेल. सर्व पदांची जात प्रवर्ग निहाय अद्ययावत मंजुरी, कार्यरत व रिक्त स्थितीची नोंद कर्मचाऱ्यांना ॲपमध्ये करायची आहे. त्यानंतर बदलीबाबतची प्रक्रिया होईल.

एसटी महामंडळात कमर्चारी किती?

एसटी महामंडळाकडून नागरिकांना चांगली सार्वजनिक प्रवासी सेवा देण्यासाठी एकूण ८६ हजारांच्या जवळपास अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. त्यात बस चालक, बस वाहकांसह तांत्रिक व इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ६० टक्के कर्मचारी चाळिशी ओलांडलेले आहेत.

हेही वाचा : नागपुरातील समलैंगिकांचा ‘सारथी’ हरपला

एसटी महामंडळाबाबत..

एसटी महामंडळाकडून प्रवासी वाहतुकीसाठी राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या व महत्वाच्या ठिकाणी २४७ आगारे व ५७८ बसस्थानकांमार्फत वाहतूक सेवा दिली जाते. प्रवासी सेवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी महामंडळाने अभिनव योजना अंमलात आणल्या असून प्रामुख्याने बसेसच्या रचनेत व रंगसंगातील बदल करण्यात आलेला आहे. २ बाय २ आसन व्यवस्थेसह परिवर्तन बसेस, अधिक आरामदायी आसनव्यवस्थेसह निमआराम बसेस महामंडळाने पुरविलेल्या आहेत. सोबत आणखी नवीन इलेक्ट्रिकसह इतरही बसेस उपलब्ध केली जात असल्याचे एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावर नमूद आहे.