लोकसत्ता टीम

नागपूर : प्रेम करणे आणि नंतर ब्रेकअप करणे असे प्रकार नव्या पिढीसाठी सामान्य बाब झाली. पूर्वीसारखी प्रेम ही संकल्पना नव्या पिढीसाठी कायमस्वरूपी राहिलेली नाही. बरेच लोक तात्पुरत्या स्वरुपात प्रेम संबंधात येतात आणि उद्देशपूर्ती झाली कर ब्रेकअप करतात. मात्र या ब्रेकअपच्या नैराश्येतून काही लोक आत्महत्येसारखे कठोर पाऊल देखील उचलतात. एखाद्या व्यक्तीने ब्रेकअप केले आणि त्यानंतर नैराश्येमुळे दुसऱ्या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला तर ब्रेकअप केलेल्या व्यक्तीला गुन्हेगार मानता येईल का ? याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्वपूर्ण मत नोंदवले आहे.

नऊ वर्षापासून प्रेमसंबंध

अमरावती येथील दर्यापूर येथे राहणारा तरूण आणि बुलढाणा येथील शेगावमध्ये राहणारी तरुणी यांच्यात नऊ वर्षांपासून प्रेमसंबध होते. तरूण पदवीधर असून त्याने बॅचलर ऑफ कंप्यूटर अप्लिकेशन अभ्यासक्रमात शिक्षण पूर्ण केले आहे. दोघांनी लग्नाचे वचन देत शरीरसंबंध प्रस्तापित केले होते. परंतु, प्रियकराने नाते तोडत तरूणीला लग्नास नकार दिला. त्याचे दुसऱ्या तरूणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय असल्याने ती या काळात तणावात होती. तरूणीने चिठ्ठीमध्ये प्रेम भंगाचे कारण सांगत ३ डिसेंबर २०२० रोजी गळफास घेत आत्महत्या केली होती. यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी खामगावच्या सत्र न्यायालयाने आरोपीला दिलासा देण्यास नकार दिल्याने त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. उर्मिला जोशी – फाळके यांच्या खंडपीठासमक्ष याचिकेवर सुनावणी झाली.

आणखी वाचा-उपजिल्हाधिकारी, तहसीलदार होऊनही नियुक्ती न मिळाल्याने काहींचे लग्न मोडले तर काहींनी…

चिठ्ठी पुरेसा पुरावा नाही

नाते तोडल्याने तरूणी आत्महत्येस प्रवृत्त झाली, हे गृहीत धरणे पुरेसे ठरणार नाही. त्यासाठी आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि आत्महत्येचे कृत्य यांच्यात थेट साधर्म्य असायला हवे, असे उच्च न्यायालयाने नोंदविलेल्या निरीक्षणात नमूद आहे. मोबाईलमधील व्हाट्सॲप चॅटमधून दोघांमधील शरीरसंबंध सहमतीने घडून आल्याचे स्पष्ट होत आहे. तर, दोघांमधील नाते घटनेच्या चार महिन्यापूर्वीच संपुष्टात आले होते. आत्महत्या करण्यापूर्वी तरूणीने झालेल्या सपूर्ण प्रकाराबाबत तरूणाची माफी देखील मागीतली आहे. त्यामुळे, जप्त केलेले साहित्य गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसे ठरणार नाही. हा खटला चालवणे ही एक औपचारिकता असेल, असे नमूद करत उच्च न्यायालयाने हा गुन्हा रद्द केला. आत्महत्येपूर्वी लिहिलेली ती चिठ्ठी खरी जरी मानली; तरीही, आरोपीवरील गुन्हा सिद्ध करण्यासाठी ती पुरेशी ठरणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. आरोपीतर्फे ॲड. अक्षय सुदामे यांनी बाजू मांडली.

Story img Loader