लोकसत्ता टीम
यवतमाळ : वणी तालुक्यातील उकणी येथील खुल्या कोळसा खाणीच्या मुख्य मार्गावर वाघ मृतावस्थेत आढळला. वाघाचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या वाघाचे दोन मुख्य दात आणि १२ नखे गायब असल्याने वाघाचा मृत्यू नैसर्गिक आहे की त्याची शिकार करण्यात आली, याचा शोध वनविभागाने सुरू केला आहे.
उकणी कोळसा खाण परिसरात बोअरवेलजवळील डीपीनजिक मंगळवारी तीन ते चार वर्षे वयाचा हा वाघ मृतावस्थेत आढळला. वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. या वाघाचा मृत्यू १२ ते १३ दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता वन अधिकाऱ्यांनी वर्तविली. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा अहवाल अद्याप यायचा आहे. या अहवालानंतरच वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला की, त्याची शिकार करण्यात आली, ही बाब स्पष्ट होणार आहे. दरम्यान, बुधवारी वन विभागाची चमू तपासासाठी पुन्हा घटनास्थळी गेली.
आणखी वाचा-नागपूर विद्यापीठाच्या तिजोरीत ठणठणाट? तासिका प्राध्यापकांचे वेतन थकले
वन अधिकारी विक्रांत खाडे, सहायक वन परिक्षेत्र अधिकारी आशीष देशमुख व पथकाने घटनास्थळी सखोल तपासणी केली. या वाघाला विजेचा धक्का लागल्याची शक्यता असल्याने, वन विभागाने तेथील रोहित्र व विजेच्या तारा जप्त केल्या. उकणी येथील अधिकारी, कामगार व वाघाला प्रथमदर्शनी मृतावस्थेत बघितलेल्या कामगाराचे बयान नोंदविले. या वाघाचा मृत्यू विजेचा धक्का लागल्याने झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी, वाघाचे १३ नखे व जबड्यातील मुख्य दोन दात गायब करण्यात कुणाचा सहभाग आहे काय, याचाही आता वनविभागाकडून कसून तपास केला जात आहे.
उकणी खाणीच्या प्रमुख मार्गावर हा मृत वाघ १२ ते १५ दिवस कोणाला दिसला कसा नाही? जवळपास कोणाचेही शेत वहितीत नाही, त्यामुळे वाघाला विजेचा धक्का कसा लागेल, हा प्रश्न निर्माण झाला आहे. विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला तर वाघाच्या पंजाची १३ नखे व दोन सुळे दात गायब कसे झाले, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. वाघ विजेच्या धक्क्याने दगवल्यानंतर ही घटना माहिती झाल्यावर चोरट्यांनी वाघाचे दात व नखे गायब केले, असावे अशीही चर्चा आहे. या सर्व दृष्टीने तपास सुरू आहे. हा वाघ उकणी परिसरात कुठून आला, याचाही शोध घेतला जात आहे.
आणखी वाचा-जिओ टॉवर स्कॅम : देशभरातील हजारो नागरिकांना कोट्यवधीने गंडवणारी टोळी जेरबंद, कोलकातावरून सुरू होते…
वन विभागाचे म्हणणे काय?
वाघाचा मृत्यू नैसर्गिक असण्याचीच शक्यता वाटत आहे. आज शवविच्छेदन अहवाल येणार आहे. नखे आणि दात गायब असल्याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती सहायक वन परिक्षेत्र अधिकारी आशीष देशमुख यांनी दिली.