नागपूर : हल्ली अनेक दुचाकी-चारचाकी वाहने अचानक बंद पडताना दिसतात. दुरुस्तीदरम्यान वाहनाच्या पेट्रोल टाकीत पाणी निघते. इथेनाॅल मिश्रित पेट्रोलमुळे हा प्रकार घडत असून त्यामुळे वाहनाच्या इंजिनमध्ये बिघाड होण्याचा धोका आहे. या प्रश्नावर विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशननेही आक्षेप घेत पावसाळ्यात पेट्रोलमध्ये इथेनाॅल मिश्रण करूनये, अशी मागणी केली आहे.

उपराजधानीत मागील तीन-चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. रस्त्यावर धावणाऱ्या दुचाकी- चारचाकी वाहनात बिघाड होऊन ते बंद होण्याचे प्रमाण वाढले आहे. या बंद पडणाऱ्या वाहनांची संख्या बघता दुरुस्ती करणाऱ्या मेकॅनिककडूनही अवास्तव पैसे दुरुस्तीच्या बदल्यात घेणे सुरू आहे. दुरुस्तीदरम्यान बहुतांश वाहनांच्या पेट्रोल टाकीमध्ये पाणी आढळून येतं आहे.

हेही वाचा – अर्थसंकल्पावर वडेट्टीवार यांची टीका; म्हणाले, “ही तर काँग्रेसच्या न्याय पत्राची उचलेगिरी”

पेट्रोलपंप मालकांशी याविषयी संवाद साधला असता त्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले की, शासनाने पेट्रोलमध्ये १५ टक्के इथेनाॅल मिश्रित करण्याला परवानगी दिली आहे. या पेट्रोलमध्ये थोडेही पाणी शिरले तर या पेट्रोलमधील इथेनाॅल वेगळे व्हायची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे हे पेट्रोल खराब होते. त्यामुळे हल्ली वाहनात पाणी निघण्याचे प्रमाण वाढले असून हे ग्राहक पेट्रोलपंपावर येऊन आमच्याशी वाद घालतात. त्यातच पेट्रोलियम कंपन्यांनी पावसाळ्यातील हा संभाव्य त्रास बघत सर्व पंपांवरील पेट्रोलच्या टाक्या तपासायला हव्या, परंतु तसे कुठेही होत नाही. त्यामुळे अनेकदा पेट्रोल पंप चालकांना पाणी आल्यास संपूर्ण पेट्रोल फेकून मोठे नुकसानही सहन करावे लागते. पाणी पेट्रोलमध्ये मिसळून इथेनाॅलवर प्रक्रिया होऊन ते पेट्रोल खराब करते. त्यामुळे महागड्या वाहनांचे इंजिनही बिघडण्याचा धोका आहे. या प्रश्नावर विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनकडून लवकरच पेट्रोलियम कंपनीसह जिल्हा प्रशासनालाही निवेदन देऊन किमान पावसाळ्यात पेट्रोलमध्ये इथेनाॅल मिश्रित करू नये, ही विनंती केली जाणार आहे.

“लवकरच पेट्रोलियम कंपन्या व जिल्हा प्रशासनाला किमान पावसाळ्यात पेट्रोलमध्ये इथेनाॅल मिश्रित करू नये, अशी विनंती केली जाईल. हल्ली पावसाळ्यात नागपुरात पेट्रोल टाकीत पाणी निघण्याच्या तक्रारी वाढल्या आहे. या प्रकरणात दोष नसताना पंप चालकांना ग्राहकांच्या संतापाचा त्रास सहन करावा लागत आहे.” – अमित गुप्ता, अध्यक्ष, विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन.

हेही वाचा – VIDEO : जेव्हा वाघाला पोटाची समस्या उद्भवते, तेव्हा…

राज्यात वाहनांची संख्या किती ?

राज्यात १ जानेवारी २०२४ रोजी मोटार वाहनांची एकूण संख्या ४.५८ कोटी होती. ती गतवर्षाच्या तुलनेत ५.८ टक्क्यांनी अधिक आहे. २०२३ या वर्षाच्या तुलनेत राज्यातील मोटार वाहनांच्या संख्येत २५ लाख १५ हजार ४८० ने वाढ झाली. राज्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या देखभालीखालील रस्त्यांचा विचार करता दर किलोमीटरवर सरासरी १४१ वाहने धावतात. राज्यातील एकूण वाहनांच्या तुलनेत दुचाकी वाहनांची संख्या तीन कोटी ३३ लाख २४ हजार, तर चारचाकींची संख्या ७१ लाख आहे.