संविधान संरक्षणाचा मुद्या लोकसभा निवडणुकीच्यापूर्वीपासून देशभर गाजत आहे. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या प्रचाराचा मुद्याही संविधान बचाव हाच होता, त्याचा फटका महाराष्ट्रासह देशातील इतरही राज्यात भाजपला बसला, तेव्हापासून भाजपने संविधान संरक्षण किंवा संविधान बदलणार हा खोटा प्रचार होता, असे सांगणे सुरू केले. मात्र असे असले तरी या मुद्याची धग अद्याप कायम आहे, नागपुरात बुधवारी श्याम मानव यांच्या कार्यक्रमादरम्यान भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलेली घोषणाबाजी हे त्याचेच प्रतीक मानले जाते. यानिमित्ताने भाजपच्या राडा संस्कृती दर्शनाची राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्याम मानव आणि भाजप वाद

अधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव आणि भारतीय जनता पक्ष व त्यांच्याशी संबधित विविध संघटना यांच्यात संघर्ष नवा नाही, धर्माच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबांच्या विरोधात श्याम मानव संघर्ष करतात, त्यामुळे भाजपच्या हिटलिस्टवर कायम असतात. लोकसभा निवडणुकीपासून मानव यांनी संविधान बचावाचा मुद्या हाती घेतल्याने आता ते भाजपचे राजकीय विरोधक ठरले आहेत. श्याम मानव आणि भाजप हा संघर्ष तसा जुनाच आहे, बुधवारी नागपूरमध्ये भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी घातलेला गोंधळ हा राजकीय कारणांवरून होता. यापूर्वी मानव यांनी बागेश्वर बाबा यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने मानव यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांनी केला होता.

हेही वाचा – निवडणुकीसाठी काँग्रेसचा मध्यवर्ती अड्डा, मुंबई मुख्यालय ते बूथ थेट संपर्क.

संविधान आणि राडा

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने १६ ऑक्टोबरला श्याम मानव यांचे नागपुरात व्याख्यान आयोजित केले होते. त्याचा विषय ‘संविधान बचाओ, महाराष्ट्र बचाओ’ हा होता. प्रसिद्ध विचारवंत दशरथ मडावी हेसुद्धा या कार्यक्रमात उपस्थित होते. विषयच संविधान बचाओ असल्याने मडावी यांनी संविधान संरक्षणाचा मुद्दा मांडला. मात्र यावरच भाजयुमोचा आक्षेप आहे. अनिसचा कार्यक्रम आहे, मग अंधश्रद्धेविषयी काहीही न बोलता संविधानावर वक्ते बोलतात, असे त्यांचे म्हणणे आहे. मुळात विषयच संविधान बचाओ असल्याने वक्ते त्यावरच बोलणार अशा स्थितीत त्याला विरोध करण्याचा भाजयुमोचा तर्क अनाकलणीय ठरतो, अशी चर्चा सामाजिक क्षेत्रात आहे. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन व थेट व्यासपीठाकडे धाव घेणे, राडा संस्कृतीचे दर्शन घडवणे या बाबी संविधान धोक्यात आहे हेच दर्शवणाऱ्या आहेत, हा अनिसचा दावा सार्थ ठरतो. संविधानाबाबत कोणीच बोलू नये, अशा प्रकारे धमकीच कार्यकर्त्यांच्या कृतीतून दिली गेली, याचा राजकीय वर्तुळात निषेध केला जात आहे.

हेही वाचा – ऑटोचालकाने शाळकरी विद्यार्थीनाली पळवले अन् …

भाजपच्या पायाखालची वाळू सरकते आहे का ?

नागपूर हे भाजपच्यादृष्टीने महत्वाचे शहर आहे. येथे घडलेली प्रत्येक राजकीय घडामोड देशपातळीवर चर्चेचा विषय ठरते. संविधान संरक्षण हा भाजपच्यादृष्टीने संवेदनशील मुद्दा मानला जातो. विरोधकांकडून त्याचा पद्धतशीर वापर केला जातो. आम्ही संविधान बदलणार नाही, काँग्रेसने केलेला हा खोटा प्रचार आहे, असे भाजप नेते कितीही सांगत असले तरी संविधानाच्या बाबतीत कोणी काही बोलणार असेल तर त्याला आम्ही बोलूही देणार नाही, असा संदेश नागपूरच्या भाजप कार्यकर्त्यांनी मानव यांच्या सभेत गोंधळ घालून दिला आहे. ही घटना म्हणजे भाजपच्या पायाखालची वाळू घसरतेय का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Issue of constitution shyam manav and bjp what happened in nagpur cwb 76 ssb