नागपूर : भविष्यात शरद पवार आणि भाजप एकत्र येणे अशक्य आहे, असे मत शिंदे समर्थक प्रहारचे आमदार व माजी मंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले.राज्यात मराठा, धनगर आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले आहे. त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून आले. त्यामुळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा >>> आरक्षणासाठी कोणी काय केले हे २४ डिसेंबरनंतर समाजासमोर मांडणार; मनोज जरांगे आक्रमक
अजित पवार गटाच्या आमदारांना पुरेसा निधी मिळत नसल्याने नाराजी असल्याचीही चर्चा आहे. या संदर्भाने कडू यांनी माध्यमांशी बोलताना त्यांची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, सर्वच प्रमुख राजकीय पक्ष व नेत्यांची भूमिका ओबीसींच्या बाजूची आहे. मराठा समाजाविरुद्ध इतर समाज एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू आहे. छगन भुजबळ यांना लोकहितापेक्षा राजकारण अधिक महत्त्वाचे वाटते, असे कडू म्हणाले.
अजित पवारांच्या नाराजीचे कारण वेगळेच
शरद पवार आता भाजपसोबत जाऊन वेगळी चूल मांडतील, असे वाटत नाही. राहिला प्रश्न निधी वाटपाचा तर तिजोरीची चावीच अजित पवार यांच्या हाती असल्याने निधी मिळत नाही हे त्यांच्या नाराजीचे कारण असू शकत नाही. त्याच्या नाराजीचे वेगळे काही कारण असू शकते, असे कडू म्हणाले.