अमरावती : महायुतीचे घटक असूनही लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदार संघात भाजपच्‍या विरोधात रणशिंग फुंकणारे प्रहार जनशक्‍ती पक्षाचे संस्‍थापक बच्‍चू कडू यांनी पुन्‍हा एकदा महायुतीला घरचा अहेर दिला आहे. महायुतीला आपला मोठ्या मताधिक्याने विजय होऊन भरघोस यश मिळेल, असे वाटत असले तरी सध्या राज्यात तशी काही परिस्थिती नाही. लोकांच्या मनात काही प्रमाणात जी नाराजी आहे, ती उघडपणे दिसून आली आहे. ही निवडणूक दोन्ही पक्षांनी जाती आणि धार्मिकतेच्‍या आधारावर लढवलेली आहे. त्यामुळे ही निवडणूक मुद्यांपासून दूर राहिली असल्याचे कडू म्हणाले. तसेच नेमका निकाल कोणत्या बाजूने लागेल हे सध्या तरी सांगता येत नाही, मतदार सुज्ञ आहेत, ते ठरवतील, असेही त्यांनी प्रसार माध्‍यमांशी बोलताना स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> सिमेंटचा वीज खांब अंगावर पडल्याने तरुणाचा मृत्यू; यवतमाळच्या फुलसावंगी येथील घटना

कडूंनी अमरावती मतदारसंघ वगळता इतरत्र महायुतीला जाहीर पाठिंबा दिला आहे. मात्र, असे असतानादेखील कडूंनी महायुतीवर टीकेची झोड उठवण्याची कुठलीही संधी सोडलेली नाही. अमरावतीत प्रहार जनशक्‍ती पक्षाने महायुतीच्‍या विरोधात निवडणूक लढवली. ही निवडणूक महायुतीसाठी सोपी नव्‍हती, असे त्‍यांचे म्‍हणणे आहे. येत्‍या ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत कोणाला यश मिळेल, असे कडू यांना विचारले असता ते म्हणाले की, महायुतीला भरघोस यश मिळणार नाही.

हेही वाचा >>> नागपूर : ‘रूफ टॉप’ रेस्टॉरेंटला वादळाचा धोका, महपालिकेचे कारवाईचे संकेत

सचिन तेंडुलकर यांच्यावर टीका

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्‍या निवासस्‍थानी सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रकाश कापडे यांनी गेल्‍या १५ मे रोजी जळगावच्या राहत्या घरी आत्महत्या केली. याविषयी बोलताना कडूंनी थेट आंदोलनाचा इशारा देत तेंडुलकर यांच्यावरही टीका केली. तेंडुलकर यांनी ऑनलाइन रमीची जाहिरात बंद करावी किंवा भारतरत्न पुरस्कार परत करावा, अन्‍यथा सहा किंवा सात तारखेला तेंडुलकर यांच्या घरासमोर त्यांचा पुतळा जाळणार, असा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे. ऑनलाइन रमीच्या व्यसनातून तेंडुलकरांच्या अंगरक्षकाने आत्महत्या केल्याचा आरोपही कडूंनी केला आहे. ज्या व्यक्तीचा भारतरत्न म्हणून गौरव करण्यात आला त्यांच्याच जाहिरातीमुळे त्यांचाच अंगरक्षक आत्महत्या करत असेल तर याचा निषेध आम्ही करणार आहोत. सचिन तेंडुलकर यांनी गेमिंगची जाहिरात सोडली पाहिजे. जर सचिन यांनी जाहिरात थांबविली नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पुतळा जाळणार आहोत आणि पुन्हा आंदोलन करणार आहोत, असा इशारा कडूंनी दिला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is impossible for mahayuti to achieve massive success in lok sabha election says mla bachu kadu mma73 zws