प्रशांत देशमुख
वर्धा : किरकोळ दुकानदार व व्यापाऱ्यांप्रमाणेच डॉक्टरांनाही रुग्णाचे वजन मोजणाऱ्या काटय़ाची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे वैद्यकीय संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.ही अजब सूचना अनेक डॉक्टरांना संभ्रमात टाकत आहे. सरकारला म्हणायचे तरी काय, असा प्रश्न त्यांना पडला आहे. वैधमापन शास्त्र (वजनकाटा) खात्याच्या निर्देशानुसार, रुग्णाचे वजन करण्यासाठी वापरले जाणारे डॉक्टरांकडील काटे वैधमापन शास्त्र विभागाकडून प्रमाणित करण्यात यावे, अन्यथा पाच हजार रुपयाचा दंड होऊ शकतो. म्हणून भारतीय वैद्यक संघटनेने त्यांच्या संघटनेच्या सदस्यांना पडताळणी करण्याची सूचना करावी.
रुग्णाच्या वजनानुसार आजाराचे निदान करण्याचे शास्त्र नाही. बालरोग तज्ज्ञास काही प्रमाणात गरज पडते. डॉक्टरांकडे केवळ शरीराचे वजन करणारे यंत्र असते. आता हे यंत्र हातात घेऊन सरकारी कार्यालयात तिष्ठत बसावे लागणार का, असा प्रश्न डॉक्टरांकडून उपस्थित केला जात आहे. चुकीचे वजन मोजण्यात आल्याने रुग्णाचा बळी गेला, असे होत नाही. मुळात हा आदेश छोटी रुग्णालये बंद करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असू शकतो, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.
याबाबत खात्याचे एक अधिकारी अभंगे म्हणाले, हा आदेशच आहे. डॉक्टरांनी पडताळणी करून घ्यायला काय हरकत आहे?
‘व्यापारी तरतुदी लागू करणे अयोग्य ’
वैद्यकीय व्यवसायास केवळ व्यवसाय म्हणून पाहून व्यापारी तरतुदी लागू करणे योग्य नाही. आदेशातील ‘सुरक्षेसाठी’ हा शब्द आमच्या व्यवसायास लागू होऊ शकत नाही. आधीच १६ प्रमाणपत्रे बंधनकारक केली आहेत. त्यात आणखी एकाची भर पडली आहे, अशी प्रतिक्रिया महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा यांनी व्यक्त केली.