नागपूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या सुनावणीत सहभागी होण्यासाठी आता प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाने ऑनलाईन सुनावणीचा प्रयोग सुरू केल्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयानेही यात पुढाकार घेतला आहे. पक्षकारांना दृकश्राव्य माध्यमातून सहभाग घेता येणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठात देखील मागील आठवड्यापासून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. न्यायालयीन सुनावणीत सहभागी होण्यासाठी पक्षकार, प्रतिवादी किंवा वकिल यांना न्यायालयात अर्ज करावा लागेल. सुनावणीदरम्यान पक्षकारांना लिंक उपलब्ध करून दिली जाईल. त्यामाध्यमातून पक्षकार किंवा प्रतिवादी न्यायालयाची कार्यवाही थेट बघू शकतात किंवा त्यात सहभागी देखील होऊ शकतात.
हेही वाचा… देशाच्या काही भागांत येत्या २४ तासांत पावसाची शक्यता! महाराष्ट्रात कुठे पडणार पाऊस? जाणून घ्या…
पक्षकारांच्या प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाल्यावर लिंकच्या माध्यमातून होणारे प्रक्षेपण बंद करण्यात येईल. ऑनलाईन प्रक्षेपणाची सुविधा सध्या सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नसून केवळ संबंधित प्रकरणाशी निगडित लोकांसाठीच उपलब्ध करून देण्यात आली आहे.