अकोला : जिल्ह्यातील संस्थाचालक अविनाश मनतकार यांनी मलकापूर अर्बन बँकेच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून नागपूरमध्ये आत्महत्या केल्याचे उघडकीस आली आहे. आत्महत्या पूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदारांसह ठाणेदारावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. अविनाश मनतकार हे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या आणि अकोला जिल्हा परिषदेच्या माजी सभापती नयना मनतकार यांचे पती आहेत.
तेल्हारा शहरातील वांगेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक अविनाश मनतकार हे काही दिवसांपूर्वी मलकापूर अर्बन बँकेच्या भ्रष्टाचार प्रकरणी आरोप झाल्याने ते व्यथित झाले होते. या पार्श्वभूमीवर मनतकार दाम्पत्य न्यायालयीन कामकाजाच्या निमित्ताने नागपुरात गेले. अविनाश मनतकार यांनी त्यांच्या पत्नीजवळ शेगावला जायचे असल्याचे सांगून त्यांनी नागपुरातील अजनी रेल्वेस्थानक गाठले. गुरुवारी सायंकाळी त्यांनी राजधानी एक्सप्रेसपुढे झोकून देत आत्महत्या केली. त्यांचा मोबाइलही त्यांच्याजवळ नव्हता. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. नयना मनतकार यांनी आपल्या नातेवाईकांना पती बेपत्ता झाल्याची माहिती दिली. नातेवाईकांकडून शोधाशोध सुरू असताना मनतकार यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याच शुक्रवारी सायंकाळी स्पष्ट झाले.
हेही वाचा >>> भाजपची काँग्रेस होईल ही भीती फडणवीस यांना का वाटते?
दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी मनतकार यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यात भाजपचे बुलढाणा जिल्ह्यातील नेते व माजी आमदार चैनसुख संचेती यांच्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचं त्यांनी म्हटले आहे. मलकापूर अर्बन बँकेच्या भ्रष्टाचारात अध्यक्ष संचेती आणि उपाध्यक्ष लखाणी यांनी पती-पत्नीला फसवल्याचा आरोप त्यांनी चिठ्ठीमध्ये केला आहे. भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास करणारे अकोल्यातील रामदासपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांनी आपल्याकडून ३८ लाख रुपये उकळूनही आपल्याला मदत केली नसल्याचेही त्यांनी चिठ्ठीमध्ये नमूद केले. संपूर्ण संचालक मंडळाची चौकशी करावी, असे त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.