इंदिरा गांधी या राजकारणात एकटय़ा पडल्या होत्या. विरोधकांनी त्यांची कोंडी केली होती. एका कर्तृत्त्ववान महिलेला संकटाच्या काळी मदत करावी या हेतूनेच मी त्यांना साथ दिली, यात काहीही चूक नव्हती. मात्र, ज्यांना ती चूक वाटत असेल तर ती वारंवार करण्याची आपली तयारी आहे, असे स्पष्ट प्रतिपादन विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांनी केले.
‘लोकसत्ता’च्या नागपूर कार्यालयाला त्यांनी शुक्रवारी भेट दिली, त्याप्रसंगी ते बोलत होते. धोटे यांच्या नेतृत्त्वातील स्वतंत्र विदर्भाची चळवळ ऐन भरात असतानाच ते इंदिरा गांधी यांच्यासोबत गेल्याने क्षीण झाली, असा आरोप केला जातो.
हा आरोप धोटे स्पष्टपणे नाकारतात. अडचणीच्या काळात एकटय़ा पडलेल्या महिलेला मदत करणे ही चूक नव्हतीच, उलट तो मानवधर्म होता. त्यामुळेच वेळोवेळी अशी चूक करण्याची आपली तयारी आहे, असे धोटे सांगतात. मुळात मी काँग्रेसमध्ये गेलोच नाही. इंदिरा गांधी यांनाच काँग्रेसने पक्षातून बाहेर काढले होते. त्यावेळी त्या एकटय़ा पडल्या होत्या. त्यांचे राजकीय विरोधक खालच्यास्तरावर जाऊन त्यांची कोडी करीत होते. त्यांना मदतीची गरज होती. त्यांच्यासोबत जाताना त्यांच्यापुढे विदर्भाच्या मागणीचा मुद्दाही मांडला व त्यांनी त्याला होकारही दिला होता. तत्कालीन जनता सरकारच्या काळात विरोधी पक्षाची भूमिका बजावू आणि विदर्भाचा मुद्दाही रेटू, असे ठरले होते. पण नेत्यांच्या नाकार्तेपणामुळे जनता सरकार लवकरच गडगडले आणि पुन्हा इंदिरा गांधी सत्तेवर आल्या. त्यानंतरही त्यांना मी विदर्भाची आठवण करून दिली. पण नंतर त्यांनी शंका उत्पन्न केल्याने साथ सोडली. संकटकाळात मदतीला धावून जाण्याची भावनाच आता लोप पावली आहे, असे धोटे म्हणाले. इंदिरा गांधींसोबत गेल्याने चळवळीची हानी झाली, असे म्हणणेही अयोग्य आहे. मी गेल्यानंतर इतर नेते होते. त्यांनी ती पुढे नेणे अपेक्षित होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
भाजप विश्वासघातकी
भाजपने भुवनेश्वर अधिवेशनात स्वतंत्र विदर्भाचा ठराव केला. गेल्या निवडणुकीत त्यांनी या मुद्दाचा प्रचारासाठी वापर केला. केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यास विदर्भ देऊ, असे आश्वासन दिले. सत्ता आल्यावर या पक्षाच्या नेत्यांची भाषा बदलली. राजकारणात मूल्ये ेपाळायची असतात आणि मूल्यांवर सर्वाधिक प्रवचने भाजप नेतेच देत असतात. तेच आता ते पायदळी तुडवीत आहेत. सत्तेच्या शेवटच्या टप्प्यात विदर्भ राज्य दिले जाईल, असे भाजपमधील काही मंडळी सांगतात. पण त्यांच्यावर विश्वास नाही. शिवसेनेसोबत युती असेपर्यंत भाजप स्वतंत्र विदर्भ करणार नाही. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड राज्यांची निर्मिती केली होती. त्याचवेळी विदर्भाचाही विचार होणार होता. पण शिवसेनेने दिलेल्या तंबीमुळे भाजप माघारली. गडकरी-फडणवीस यांनी विदर्भाच्या जनतेला शब्द दिला आहे. त्यांनी तो फिरविला तर लोक त्यांना माफ करणार नाहीत, असे धोटे म्हणाले. मोदींबाबत बोलताना धोटे यांनी त्यांचे वर्णन ‘पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिला दो लगे ऊस जैसा’ असे केले. ते कधी गांधी, कधी शास्त्री तर कधी नेपोलियनचे गुणगाण करतात. लोकांची नाडी त्यांना कळली असून त्यानुसार ते इलाज करतात याकडेही धोटे यांनी लक्ष वेधले.
स्वतंत्र राज्याची मागणी काँग्रेसचीच
स्वतंत्र विदर्भ राज्य होणारच असा विश्वास व्यक्त करताना धोटे यांनी ही मागणी मूळची काँग्रेस पक्षाचीच होती याचे दाखलेही दिले. १८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. पक्षाच्या लखनौ, मद्रास, दिल्ली आणि नागपूरमधील दोन अधिवेशनात स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव झाला होता. मात्र, याला पंडित नेहरूंचा विरोध होता. पश्चिम महाराष्ट्रासोबत विदर्भ गेला नसता तर राज्यात काँग्रेसची सत्ता आली नसती आणि यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले नसते, हे नेहरूंना उमगले होते. ही बाब नंतर त्यांनी मान्यही केली होती, असे धोटे म्हणाले.