लोकसत्ता टीम
नागपूर : रेल्वे स्थानक, धावत्या गाडीतून चोरी गेलेल्या, हरवलेल्या वस्तू परत मिळणे जवळजवळ अश्यकच असते, परंतु रेल्वे सुरक्षा दलाने मनावर घेतले आणि योग्य दिशेने तपास केल्यास चोरी गेलेल्या वस्तू मिळवल्या जाऊ शकतात, असाच काही अनुभव मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात आला. एप्रिल महिन्यात आरपीएफने सात लाखांहून अधिक किंमतीच्या वस्तू प्रवाशांना परत मिळवून दिल्या आहेत.
आरपीएफने एप्रिल महिन्यात सामान गहाळ झाल्याची २६ प्रकरणे नोंदवली. या प्रकरणांचा तातडीने तपास करण्यात आला. चोरी गेलेल्या आणि हरवलेल्या वस्तूंपैकी ७ लाख २१ हजार ९१० रुपये किमतीचे सामान संबंधित प्रवाशांना सुपूर्द करण्यात आले.
आणखी वाचा-काँग्रेस आमदार विकास ठाकरेंचा गंभीर आरोप, निवडणूक रोखे खरेदीशी संबंधित कंपनीला कंत्राट?
प्रवाशांनी मौल्यवान वस्तू नेहमी सोबत ठेवणे, बॅग सुरक्षितपणे लॉक करणे आणि सामान दुर्लक्षित सोडणे टाळणे, असे आवाहन रेल्वे सुरक्षा दलाने केले. या सोप्या गोष्टींमुळे रेल्वे प्रवासादरम्यान सामानाचे नुकसान किंवा चोरी रोखण्यासाठी खूप मदत करू शकतात. प्रवासादरम्यान आढळणाऱ्या कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा घटनांची तक्रार तातडीने जवळच्या आरपीएफ, जीआरपी कर्मचारी किंवा तिकीट तपासणीसांकडे करावी, असेही आवाहन मध्य रेल्वेचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त मनोजकुमार यांनी केले.