लोकसत्ता टीम
वर्धा: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील म्हणजेच आयटीआयचे प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वीकारणे सुरू झाले आहे. प्रवेश प्रक्रियेत चार मुख्य फेऱ्यांसह एक समुपदेशन व एक खासगी संस्थास्तरीय, अशा एकूण सहा फेऱ्या राहणार आहेत.
या प्रक्रियेत पाच बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. एका विद्यार्थ्यास एकच अर्ज भरता येईल. अधिक भरल्यास सर्व अर्ज रद्द करून प्रवेश प्रक्रियेतून बाद केल्या जाईल. अर्जाचे निश्चितीकरण करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येक फेरीत एक ते शंभर पसंतीक्रम देता येईल. पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीक्रमानुसार संस्था मिळाल्यास त्याच संस्थेत प्रवेश घ्यावा लागेल. अन्यथा चौथ्या फेरीपर्यंत प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, तर दुसऱ्या फेरीत पसंतीक्रम एक ते तीनपैकी कोणताही एक, तिसऱ्या फेरीत पहिल्या पाच पसंती क्रमापैकी कोणताही एक व चौथ्या फेरीत कोणत्याही एका पसंतीक्रमपैकी संस्था मिळाल्यास प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
हेही वाचा… “सत्तास्थापनेच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाची न्यायिक चूक”, ॲड. असीम सरोदे यांचे परखड मत, म्हणाले…
पहिल्या तीन फेरीत संस्था न मिळाल्यास पसंतीक्रमात बदल करता येईल. अन्यथा जुन्या पसंती क्रमानुसारच निवड यादी प्रसिद्ध केल्या जाईल. समुपदेशन फेरीसाठी पात्र तसेच नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करावा लागणार असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती व प्रवेश अर्ज शुल्क जमा करण्यासाठी १२ जून ते ११ जुलै ही मुदत आहे. अधिक तपशील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.