गोंदिया : अर्जुनी मोर तालुक्याचे वैभव असलेले ईटियाडोह धरण आज २१ सप्टेंबरला सकाळी ७ वाजता ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
निसर्ग सौंदर्याने नटलेला ईटियाडोह परिसर पावसाळ्याच्या दिवसात अधिकच खुलून दिसते. संपूर्ण मातीकामाने तयार करण्यात आलेला इटियाडोह धरण गाढवी नदीवर बनविण्यात आलेला आहे. सुट्ट्यांच्या दिवसात हजारो पर्यटक या धरणाला भेट देतात. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या धरणावर निसर्गाने सौंदर्याची मुक्त उधळण केली आहे.
हेही वाचा – विदर्भातील एकमेव लाकडी गणपती ज्याचे विसर्जन होत नाही…
सन २०१३ नंतर तब्बल सहा वर्षांनी सन २०१९ ला आणि मागील वर्षी १५ ऑगस्ट २०२२ ला इंटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाले होते. आता २१ सप्टेंबर २०२३ ला पहाटे सहा वाजता इटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाले. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ईटियाडोह धरण पर्वताच्या मधोमध आहे. धरणापासून भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन सिंचित करणारे धरण म्हणूनही प्रख्यात आहे. पर्यटकांनी नदीपात्र ओलांडू नये, शेतीची अवजारे नदीपात्रात ठेवू नये, जनावरांना नदीपात्र ओलांडू देऊ नये, जलाशयाच्या सांडव्यावरून ओव्हर फ्लो होणारा विसर्ग कमी जास्त असू शकतो, त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे, अशी सूचना केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ कदम यांनी केली आहे.