नागपूर : देशातील विविध रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास केला जात असून त्यात नागपुरातील इतवारी रेल्वेस्थानकाचा समावेश आहे. या रेल्वेस्थानकावर पुनर्विकासाचे काम पूर्ण झाल्याने स्थानकाचे रूपडे पालटले आहे. केंद्राच्या अमृत भारत स्टेशन योजनेत देशातील १,३३७ स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे.त्यात इतवारी रेल्वेस्थानकाचा (नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शन) समावेश आहे. त्यासाठी सुमारे १२.३९ कोटी मंजूर करण्यात आले. आता या स्थानकाचे आता काम पूर्ण झाले आहे.
त्यामुळे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी झाली आहे. तसेच वाहनतळासाठी जागा उपलब्ध झाली आहे.
दरम्यान, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते इतवारी रेल्वेस्थानकाचे ‘नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानक’ असे नामकरण करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील १ हजार ५०० रेल्वे भुयारी मार्ग (आरयूबी)चे लोकार्पण तसेच अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत ५५४ विकासकामांचे आभासी पद्धतीने भूमिपूजन झाले.
हेही वाचा…वर्धा : धक्कादायक! बदनामी केली म्हणून महिलेचा खून…
त्याच दिवशी हा कार्यक्रम इतवारी रेल्वे स्थानकावर आयोजित करण्यात आला.
यावेळी आमदार कृष्णा खोपडे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या डीआरएम नमिता त्रिपाठी आदींची प्रमुख उपस्थिती होती. मध्य रेल्वेच्या वतीने नागपूर विभागात १३५.४४ कोटी रुपयांचे ३६ भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत. तर अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या १५ रेल्वेस्थानकांचा समावेश असून तीन रेल्वेस्थानकांचे काम पूर्ण झाले आहे.
उर्वरित १२ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. इतवारी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी १२.३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. ऐतिहासिक शहरांमध्ये गणना होत असलेल्या नागपूर शहरात अनेक प्राचीन व पुरातन वास्तू आहेत. आजही त्या जुन्याच नावाने ओळखल्या जातात. नागपूरचे इतवारी रेल्वे स्थानक त्यापैकीच एक. त्याचा नामविस्तार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हे रेल्वे स्थानक नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानक या नवीन नावाने ओळखले जात आहे.
हेही वाचा…Oath Ceremony : देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री शपथविधीसाठी खास चार जॅकेट तयार!
जन औषधी केंद्र
सुरक्षेकरिता सहा सीसीटीव्ही कॅमरे हायमास्ट लाईट लावण्यात आले आहेत. माफक दरात औषध उपलब्ध व्हावे म्हणून जन औषधी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
नागपूरची संत्री
रेल्वेस्थानकावर नागपूरची संत्री, आदिवासी गोंड कला आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांची प्रतिमा पेंटिंगमधून साकारण्यात आली आहे. रेल्वे डब्यात उपाहारगृह सुरू करण्यात येणार आहे. उपाहारगृहाचे काम लवकरच पूर्ण केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.